नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.  ‘नवी मुंबई  भूमिपुत्रांना खरा न्याय मिळवून देण्याचे काम दि.बा पाटील यांनी केले. सिडकोने विमानतळाला  दिबांच्याऐवजी दुसरे नाव देण्याचा ठराव आणला तो हटवावा व दि.बा.पाटील यांचेच नाव देण्याचा ठराव मंजूर करावा,’ अशी मागणी करत १५ ऑगस्टपर्यंत ही कार्यवाही न झाल्यास १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद पाडण्यात येईल, असा इशारा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी जाहीर सभेतून दिला.

सिडको भवनाला घेराव घालण्यासाठी चालून आलेल्या आंदोलकांना पोलिसांनी पामबिच मार्गाजवळ रोखल्यानंतर याचठिकाणी जाहीर सभा पार पडली. यासभेला  लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त कृती समितीचे समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, रमेश बालदी, मंदा म्हात्रे, मनसेचे राजू पाटील, रविंद्र चव्हाण, रमेश पाटील, योगेश पाटील, माजी मंत्री हुसेन दलवाई, माजी खासदार रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, संजीव नाईक आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

‘विमानतळाला ‘दिबा’ यांचेच नाव देण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासूनचा आहे. गेल्या काही महिन्यांपासून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुढे आणण्यात आले. हे अत्यंत चुकीचे आहे. आज सर्वपक्ष सोडून सारा समाज दि. बा. पाटील यांच्या नावासाठी एकवटला आहे. आता आम्ही स्वस्थ बसणार नाही,’ असा इशारा दशरथ पाटील यांनी दिला. याठिकाणी ठाकूर, पाटील यांच्याखेरीज अन्य नेत्यांचीही भाषणे झाली. ‘भूमिपुत्रांकडे आलेली घरे, गाडय़ा सर्व काही दिबांच्या पुण्याईने मिळाल्या आहेत. त्यामुळे विमानतळाला दिबांचेच नाव दिले गेले पाहीजे अन्यथा शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारा समाज खवळल्याशिवाय राहणार नाही,’ असे बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या. तर हे आंदोलन कुणा एका पक्षाचे नसून भूमिपुत्रांच्या अस्मितेचे असल्याचे आमदार रमेश पाटील म्हणाले.

यावेळी कृती समितीच्या वतीने एक शिष्टमंडळ तयार करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने सिडको भवनात जाऊन विमानतळाच्या नावाबाबत तसेच अन्य मागण्यांबाबतचे निवेदन सिडको अधिकाऱ्यांना सादर केले.