सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील हजारो लाभार्थ्यांना दिलासा

नवी मुंबई : सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील हजारो लाभार्थ्यांना घरांचे हप्ते भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याशिवाय विलंब शुल्कही माफ करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

अल्प उत्पन्न घटकांकरिता सिडको घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या भागांत १४ हजार ८३८ घरे बांधत आहे. २ ऑक्टोबर २०१८ रोजी या घरांसाठी सोडत काढण्यात आली होती.

या घरांची खरेदी किंमत भरण्यासाठी सिडकोने लाभार्थ्यांना हप्ते आखून दिले आहेत. ते भरण्याची अंतिम मुदत ३० जून २०२० अशी  देण्यात आली होती. परंतु करोनामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याने लाभार्थ्यांनी गृहकर्जासाठी बँकांकडे केलेल्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे त्यांना कर्जही मिळालेले नाही.

या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहींचे रोजगार बंद पडले आहेत. अनेकांच्या वेतनात कपात झाली आहे. अशा स्थितीत मुदतीत हप्ते भरणे शक्य नसल्याने हक्काचे घर हातातून जाण्याची भीती या लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात होती.

सिडकोने यापूर्वीच ४ जूनच्या प्रसिध्दीपत्रकानुसार २२ एप्रिल ते ३१ मे २०२० या कालावधीतील विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. जे अर्जदार ३० जूनपर्यंत सर्व हप्ते सुरळीत भरतील अशाच अर्जदारांना विलंब शुल्कमाफीचा लाभ घेता येणार होता.

परंतु, आता अल्प उत्पन्न आणि आर्थिक दुर्बल घटकांतील  लाभार्थ्यांना ३० जूनपासून पुढील तीन महिने सिडकोच्या घराचे हप्ते भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयावर लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या निर्णयाबाबत सिडको जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क करूनही तो होऊ शकला नाही.

‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना ग्राहकांचा घेराव

पनवेल : टाळेबंदीनंतर वीजग्राहकांच्या हाती तिप्पट वीजदेयके पडली आहेत. याविरोधात वीजग्राहकांनी बुधवारी खांदा कॉलनीतील महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना घेराव घातला. टाळेबंदीत घरगुती वीज वापर वाढला होता. त्यामुळे देयकांची रक्कम वाढली. मात्र, कामोठेतील एका व्यापाऱ्याचा गाळा बंद असूनही तिप्पट वीजदेयक आले आहे. शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख लीलाधर भोईर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त केली. कामोठे, कळंबोली आणिा खांदेश्वर, करंजाडे आणि पनवेल येथील वीजग्राहकांना वाढीव देयकांमुळे झटका बसला आहे.

३० जूनपर्यंत असलेली हप्ते भरण्याची मुदत पुढील तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. त्यावरील विलंब शुल्कही माफ करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे.

   – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री