तीन दिवसांच्या सलग सुटीचा फायदा; छोटय़ा कामांवरही भर

नवी मुंबई</strong> : नवी मुंबई पालिका निवडणुकांची घोषणा पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी भूमिपूजन आणि विकासकामांच्या उद्घाटनांचा सपाटा लागल्याचे चित्र आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी सलग तीन दिवस सुटी असल्याने उद्घाटन कार्यक्रमांमध्ये सारेच लोकप्रतिनिधी गुंतलेले असल्याचे चित्र होते. भूमिपूजनाच्या कार्यक्रमांमध्ये शेकडो नारळ फुटत असल्याचे चित्र सध्या नवी मुंबईत दिसत आहे.

विद्यमान नगरसेवकांनी विविध कामांचा श्रीगणेशा केला आहे. शहरातील १११ प्रभागांमध्ये दिवसाकाठी सरासरी ५० हून अधिक कार्यक्रम पार पडले. यात नागरी विकासकामे आणि कार्यालयांची उद्घाटने गेल्या तीन दिवसांत आटोपण्यात आली.

याशिवाय हळदी-कुंकू समारंभ, आरोग्य शिबिरे, क्रिकेट स्पर्धा, लोकनेता चषक स्पर्धा, महोत्सव, उद्योग मेळावे तसेच कार्यकर्ता मेळावे भरविण्यात आले. ठरावीक विकासकामांच्या उद्घाटनावर भर राहिलेल्या लोकप्रतिनिधींनी निवडणुकीच्या तोंडावर प्रभागातील छोटय़ा कामांचाही भूमिपूजन सोहळा आटोपून घेण्यास सुरुवात केली आहे. यात अनेक नागरिकांना निमंत्रणे देण्यात आली आहेत. काही ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते विकासकामांचा नारळ फोडला गेला. यात काही नागरिकांचा सन्मानही करण्यात आला.

बहुसदस्यीय पद्धत रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर आणि आरक्षण सोडतीनंतर आपल्या सोयीस्कर प्रभागांचा अंदाज घेत इच्छुक कामाला लागले आहेत. सध्याच्या

कार्यरत नगरसेवकांकडून विविध कामांचा श्रीगणेशा करण्यास सुरुवात झाली आहे, तर अनेक झालेल्या कामांची धुमधडाक्यात होत आहेत.

लोकप्रतिनिधींनी शहरासह गावठाण भागांतील समस्यांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील काही प्रमुख विकासकामांवरच आजवर आजी-माजी लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित केले होते. मात्र आता त्यांनी शहरातील आणि गावठाण भागांतील छोटय़ा समस्यांकडेही लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी सुटीचे वार निवडण्यात येत आहेत. गेल्या आठवडय़ात नागरिकांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमांमधून हे दिसून आले आहे.

तिन्ही पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती

या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्याचे निश्चित मानले जात आहे. राज्याच्या सत्तेत यशस्वी ठरलेला ‘मविआ’चा (महाविकास आघाडी) प्रयोग नवी मुंबई पालिकेतही राबविण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांपैकी कोणत्याही पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या उद्घाटनाच्या वा भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला तीनही पक्षांचे नेते उपस्थिती दर्शवीत आहेत. पालिका हद्दीतील गावांत काही नेत्यांकडून फिरून मतदारांची विचारपूस केली जात आहे. गेली पाच वर्षे आम्हाला कोणी कसे आहात म्हणून विचारले नाही, पण आता निवडणुकांचा मोसम आल्यावर मात्र आमच्या तब्येतीची चौकशी केली जात आहे, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकाने ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.

मनसेचा वर्धापन दिन सोहळा नवी मुंबईत

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन  सोहळा यंदा (९ मार्च) नवी मुंबईत होत आहे. पक्षवाढीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या सोहळ्यात राज ठाकरे काय घोषणा करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. पालिका निवडणुकीसाठी मनसेने नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी मनसेने पक्षवाढीवर भर दिला आहे. मनसेचा वर्धापनदिन सोहळा आजवर मुंबईत झाला आहे. यंदा प्रथमच तो नवी मुंबईत होत आहे.