विकास महाडिक, लोकसत्ता

नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या सुवर्णमहोत्सवी दिनावर करोना विषाणूच्या प्रसाराची गडद छाया दिसून आली. बेलापूर येथील मुख्यालयावर मंगळवारी कामगार संघटनेच्या आग्रहास्तव एक फुलांचे तोरण बांधण्यात आले. करोनामुळे सोमवारपासून सिडकोत अभ्यागतांना बंदी घालण्यात आल्याने मंगळवारी सिडकोत शुकशुकाट होता.

राज्य शासनाच्या केवळ चार कोटींच्या भागभांडवलावर १७ मार्च १९७० रोजी स्थापन झालेल्या सिडकोने आजच्या घडीला नऊ हजार कोटी बचतीचा पल्ला गाठला आहे. मात्र या श्रीमंत महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी दिनावर मात्र शुकशुकाट दिसून आला.

मुंबईवर आदळणारे लोंढे थोपविण्यासाठी एका पर्यायी शहराची निर्मिती करणे साठच्या दशकातील राज्यकर्त्यांना आवश्यक वाटले. त्यामुळे मुंबईपल्याड असलेल्या ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यातील शासकीय व खासगी अशी ३४४ चौरस किलोमीटर जमीन संपादन करून नवी मुंबई शहर वसविण्यात आले आहे. ऐरोली ते द्रोणागिरीदरम्यान सिडकोने आतापर्यंत १४ उपनगरे विकसित केली असून एक लाख चाळीस हजारांपर्यंत घरे बांधलेली आहेत. येत्या काळात सिडको दोन लाख आणखी घरे बांधणार असून खासगी विकासकांना भूखंड देऊन इमारती बांधण्यास प्रोत्साहन दिल्याने शहराची लोकसंख्या वीस लाखांच्या घरात गेली आहे. १९७६ मध्ये वाशी सेक्टर एकमध्ये बांधण्यात आलेल्या इमारतीतील सिडकोची घरे ही सिडकोची पहिली गृहनिर्मिती म्हणून ओळखली जाते. त्या वेळी सिडको स्वत: घरे न बांधता केवळ सिमेंट आणि लोखंड बांधकाम व्यावसायिकांना पुरवठा करीत होती. त्या काळात सिडकोची घरे घ्यावीत म्हणून अधिकारी एमआयडीसीतील कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर अर्ज घेऊन विनंत्या करीत होते. तीन ते आठ हजार रुपयांतील ही घरे घेण्यास मुंबईकर राजी होत नसल्याचा अनुभव आजही काही निवृत्त अधिकारी सांगत आहेत. वाशीतील सिडकोच्या घरांची आज किंमत कमीत कमी चाळीस लाखांपर्यंत आहे. नव्वदच्या दशकात नेरुळ येथे सुरू करण्यात आलेल्या अनिवासी संकुलामुळे सिडकोच्या घरांची जगात ओळख झाली. केवळ एक हजार ७०० रुपये चौरस फूट किमतीत ही घरे विकली गेली होती. ही घरे विकण्यासाठी सिडकोचे काही अधिकारी त्या वेळी सिंगापूर, दुबई, मलेशिया या आशिया खंडातील देशांत गेले होते. विविध गृहनिर्माण योजना, रस्ते, धरण, उद्याने, मलनि:सारण वाहिन्या, भरतीचे पाणी रोखण्यासाठी होल्डिंग पॉण्ड, समाजमंदिरे, पोलीस ठाणी, शाळा, कॉलेज यांची उभारणी सिडकोने केली. संपूर्ण देशात ६७ टक्के भागभांडवलाची गुंतवणूक करून रेल्वेला येण्यास भाग पाडणारी केवळ सिडको हे एकमेव महामंडळ आहे. राज्याच्या नावलौकिकात शिरपेचाचा तुरा खोवणाऱ्या या सिडकोचा मंगळवारचा वर्धापन दिन मात्र करोनाच्या भीतीमुळे अतिशय निराश वातावरणात साजरा केला गेला.

सिडकोचा मंगळवारचा ५० वा वर्धापन दिन हा काही कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी आपुलकी आणि अस्मितेचा होता. त्यामुळे कामगार संघटनेने  केक कापून साजरा केला तर सिडको मुख्यालयाला एक तोरण बांधण्यात आले.

प्रकल्पग्रस्त जे काही आज आहेत ते सिडकोमुळे हे आम्ही मान्य करतो. सिडकोमुळे आमची जीवनशैली उंचावली. आमच्या जमिनीच्या बदल्यात जरी हे सर्व असले तरी त्याची जाणीव असणे आवश्यक आहे. या चळवळीत प्रकल्पग्रस्त नेते दि बा पाटील, कामगार नेते श्याम म्हात्रे आज नाहीत. सिडकोचा वर्धापन दिन हे संकट टळल्यावर आम्ही उत्साहात साजरा करू.

-विनोद पाटील, अध्यक्ष, प्रकल्पग्रस्त कर्मचारी संघटना