उरणमधील प्रभाग पाच व सहामध्ये समस्यांमुळे रहिवासी त्रस्त

उरण शहराचा मुख्य भाग असलेल्या राज आर्केड (जुनी तुंगेकर चाळ) ते कोळीवाडय़ापर्यंतच्या प्रभाग क्रमांक पाचमधील सखल भागात भरतीच्या वेळी तसेच पावसाळ्यात घरात पाणी शिरते. तर चाणजे सव्‍‌र्हे नंबर ९८ ते कामसभाट या विभागातील प्रभाग क्रमांक सहामधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या गटारातून जात असल्याने दूषित पाण्याची समस्या वाढली आहे.

याच प्रभागात अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये, तसेच पोलीस ठाणेही येत असून येथील कार्यालय परिसरात स्वच्छतागृह तसेच पथदिव्याच्या अंधारातच ये-जा करावी लागत आहे.

विरंगुळ्यासाठी असलेल्या तुंगेकर बालोद्यानाची दुरवस्था झाली आहे. या नागरिकांच्या मूलभूत समस्या प्रथम सोडवाव्यात, अशी मागणी या दोन्ही प्रभागांतील मतदारांकडून केली जात आहे.

उरण नगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे राजकीय नेते येथील लोकांच्या दारी मतांच्या जोगव्यासाठी येत आहेत. शहरात तर सर्वत्र असुविधांची रांग लागलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी पालिकेत सत्ता स्थापण्याचा दावा करणाऱ्या पक्षांना कोणत्या आधारावर मते द्यायची, असा सवाल ‘लोकसत्ता महामुंबई’शी बोलताना केला आहे.

अंधार आणि पाणी

प्रभाग क्रमांक पाच हा राज आर्केड(जुनी तुंगेकर चाळ), नयन आर्पाटमेंट, धुळीवाडी, वाणी आळी, मोहल्ला, कोकण महाविद्यालय, तुंगेकर रुग्णालय, पारेख स्टोअर्स परिसर, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, जामा मस्जिद ते उरण कोळीवाडा असा आहे.शहराच्या या मुख्य भागातील पथदिव्यावर नेहमीच अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. धुळीवाडा ही वसाहत रेल्वे मार्गा जवळ असून खाडीशेजारी असल्याने भरतीचे पाणी तसेच पावसाचे पाणी या वस्तीत नेहमीच शिरल्याने नागरिकांच्या घराचे तसेच सामानाचेही नुकसान होते.

रोगराईचा धोका

प्रभाग क्रमांक सहा हा चाणजे सव्‍‌र्हे क्रमांक ९८ ते बौद्धवाडा, सिटिझन हायस्कूल, भाजी व मासळी मार्केट सफाई कामगार वसाहत,चाणजे कोटगाव ते कामसभाट असा आहे. या प्रभागातील मासळी मार्केट ते नगरपालिकेच्या माता रमाबाई सभागृहापर्यंतची जलवाहिनी ३० वर्षे जुनी आहे. ती जीर्ण झाल्याने गटारातील पाणी जलवाहिनीत जात असल्याने नागरिकांना नळातून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे रोगराईचा धोका निर्माण झाला आहे.