पहिल्या टप्प्यात वाशी, नेरुळ, बेलापूरला सिडकोची परवानगी

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : रेल्वे सेवा हळहळू पूर्ववत होत असल्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील रेल्वे स्थानकांवर करोना चाचणी केंद्र उभारण्याचे नियोजन केले असून पहिल्या टप्प्यात वाशी, नेरुळ व बेलापूर रेल्वे स्थानक परिसरांत ही सुविधा उपलब्ध होणार आहे. याला सिडकोनेही अनुमती दिली आहे.

नवी मुंबईत करोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आली होती. मात्र दिवाळीत बाजारात खरेदीसाठी झालेली गर्दी व करोना नियमांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे गेल्या चार दिवसांपासून पुन्हा करोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने जास्तीत जास्त करोना चाचण्या करण्याचे ठरविले आहे. यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून दिवसाला प्रतिजन व आरटीपीसीआरच्या चार हजार तपासण्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गुरुवारी दिले आहेत.

रेल्वे स्थानक परिसरात करोना चाचणी केंद्र उभारण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने यापूर्वीच केले होते. मात्र रुग्णवाढ आटोक्यात आल्याने नियोजन पुढे ढकलले होते. मात्र पुन्हा करोना रुग्ण वाढू लागल्याने याला गती देण्यात आली असून लवकरात लवकर ही चाचणी केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

रेल्वे स्थानक परिसर सिडकोच्या ताब्यात असल्याने यासाठी सिडकोकडे परवानगी मागितली होती. सिडकोने अनुमती दिल्याने आता पहिल्या टप्प्यात वाशी, नेरुळ व बेलापूर स्थानक आवारात ही केंद्रे उभारण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले. शहरात मुंबई, ठाण्यातून  दररोज अत्यावश्यक सेवेतील व लाखो महिला रेल्वेने प्रवास करीत आहेत.

रेल्वे स्थानक परिसरात करोना चाचणी केंद्र सुरू करण्यासाठी सिडकोची परवानगी आवश्यक होती. ती मिळाली असून लवकरात लवकर प्रथम वाशी, नेरुळ, बेलापूर रेल्वे स्थानकांत ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
– राजेश कानडे, उपायुक्त, महापालिका