सिडको गृहप्रकल्पातील ग्राहकांची कागदपत्र दाखल करताना तारांबळ

नवी मुंबई : सिडकोने दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या महागृहनिर्मितीतील ग्राहकांना ऑनलाइन कागदपत्र दाखल करताना आणि हप्ते भरताना मोठय़ा प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. सिडकोने ही सर्व प्रक्रिया एका खासगी माहिती तंत्रज्ञान कंपनीला दिली आहे. काही संवेदनशील कागदपत्र सिडकोत सादर करण्यास गेलेल्या ग्राहकांनाही माघारी परतावे लागले. मात्र, सिडकोने सर्व तक्रारी फेटाळल्या असून या तक्रारी उशिरा कागदपत्र वा हप्ते भरणाऱ्या ग्राहकांच्या असल्याचे स्पष्ट केले.

१४ हजार ७३८ घरे ही महागृहनिर्मितीतील असून त्यांची सोडत, वाटप, कागदपत्र, छाननी आणि हप्ते या प्रक्रिया गेली दोन वर्षे सुरू आहेत. करोनाकाळात सिडकोने या सर्व प्रक्रिया ग्राहकांना घरबसल्या पूर्ण करता याव्यात यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी एक निवारा केंद्र नावाचे वेगळे पोर्टलही तयार करण्यात आले आहे. कागदपत्र छाननीत काही ग्राहक अपात्र ठरलेले आहेत. त्यांची घरे ही प्रतीक्षा यादीत असलेल्या ग्राहकांना देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासाठी त्यांची ऑनलाइन कागदपत्र स्वीकारली जात आहेत. मात्र यात ग्राहकांना अडचणी येत आहेत. प्रतीक्षा यादीवर घर मिळालेल्या वा सोडतीतील भाग्यवंतांना सिडकोच्या वतीने ई-मेल वा लघु संदेश दिले जात असतात. परंतु यातील अनेक ग्राहकांना अशा प्रकारे संदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे सिडकोच्या निवारा केंद्र या संकेतस्थळावर नियमित भेट देऊन या घरांची सद्य:स्थिती काय आहे, हे पाहणाऱ्या ग्राहकांना कागदपत्र सादर करण्याची ३० जुलै ही मुदत असल्याचे शेवटच्या दोन दिवसांत समजले. काही जणांना हे इतर ग्राहकांकडून कळले आहे. त्यामुळे काही ग्राहकांची तारांबळ उडाल्याचे चित्र होते.

आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतरही ती स्वीकारली जात नव्हती. यासंदर्भात सिडकोच्या क्रमांकावर संपर्क साधल्यास तो होत असल्याचे ग्राहकांची तक्रार आहे. त्यामुळे ऑनलाइन कागदपत्रे स्वीकारण्यात न आल्याने अनेक ग्राहकांनी गुरुवारी सिडकोचे बेलापूर येथील  रायगड भवन गाठले. मात्र, त्या ठिकाणी सिडको कर्मचाऱ्यांनी ही कागदपत्रे स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे अनेक ग्राहकांना माघारी परतावे लागले.

प्रतीक्षा यादीवर घर लाभलेले चेंबूरचे अरुण धनेश्वर हे शिल्लक रक्कम भरण्याचा गेले चार दिवस प्रयत्न करीत आहेत. पैसे भरण्यासाठीचा दुवा (लिंक) मिळत नसल्याने धनेश्वर यांनी संताप व्यक्त केला. पैसे भरण्यास अद्याप मुदत शिल्लक आहे. पैसे भरण्यासाठी ते रोज प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यात त्यांना यश येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

सिडकोचे हजारो ग्राहक ऑनलाइन सुविधेचा लाभ घेत आहेत. काही ग्राहक मुदत संपण्याची वाट पाहतात. त्यावेळी त्यांची तारांबळ उडते. काही संवेदनशील कागदपत्र ऑनलाइन आणि ऑफलाइनही स्वीकारली जात आहेत. यात सायबर सुरक्षेचा कोणताही प्रश्न नाही. लाभधारकांना सतर्क राहून कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्रास होणार नाही.

– लक्ष्मीकांत डावरे, पणन व्यवस्थापक, सिडको