परवडणाऱ्या घरांसाठी सर्वाधिक पसंती

विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये रायगड जिल्हा आघाडीवर असल्याची माहिती ‘क्रेडाई’च्या एका कार्यक्रमात देण्यात आली. जिल्ह्य़ात निवासी आणि कार्यालयीन प्रकल्पांना चालना मिळावी, यासाठी मोठय़ा प्रमाणात पायाभूत सुविधांचे प्रकल्प, प्रमाणित आणि परवडणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या गृहप्रकल्पांत सर्वात जास्त प्रशस्त घरांचा पुरवठा केला जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

‘कॉन्फिडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (क्रेडाई) एमसीएचआय यांच्या रायगड विभागाच्या वतीने ‘चेंज ऑफ गार्ड’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या वेळी अतीक खोत यांच्याकडे रायगड अध्यक्ष पदाची धुरा सोपविण्यात आली. याप्रसंगी क्रेडाई ‘एमसीएचआय’तर्फे रायगड जिल्हा एमएमआरच्या अखत्यारीत विकसित होणारा नवा दक्षिणी प्रदेश, हा अहवाल सादर करण्यात आला. जिल्ह्य़ात औद्योगिकदृष्टय़ा मोठे बदल झाले आहेत. जिल्ह्य़ात तीन हजार ६१४ युनिट्सची नोंद झाली आहे. गेल्या चार वर्षांत ही जलदगतीने वाढ झाली आहे. यात संक्षिप्त, मध्यम आणि मोठय़ा प्रमाणातील उद्योगांचा समावेश आहे आणि अधिकृत क्षेत्रात ८९ हजार लोकांना रोजगाराच्या एकत्रित संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

ठाणे, नवी मुंबईच्या बाजारपेठात भाडेतत्त्वावरील जागेसाठी प्रतिमहिना ५० ते ६० रुपये प्रति चौरस फुटांचा दर आहे. ज्यांना कमीत कमी दरात मोठी जागा हवी, अशा व्यावसायिकांना ही संधी दिली जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

मालमत्ता वर्गात सुधारणा

जिल्ह्य़ातील खारघर, पनवेल, तळोजा, रसायनी, कळंबोली, द्रोणागिरी आणि उलवे या ठिकाणी निवासी विकास होत आहे. नवी मुंबईच्या तुलनेत या ठिकाणी अधिक परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध आहेत, शिवाय येथे वाहतुकीसाठी योग्य साधने आहेत. तसेच ही ठिकाणे चांगली दळणवळण आणि गुंतवलेल्या पैशांचे योग्य परतावे देणारी आहेत. जिल्ह्य़ात साधारण ५ हजार ते ७ हजार रुपये प्रतिचौरस फूट असा दर असून, नवी मुंबईत १० हजार रुपये चौरस फूट असा दर सुरू आहे.

क्रेडाई एमसीएचआय-जेएलएल अहवालात मांडल्यानुसार, रायगड परवडणाऱ्या घरांसाठी एक उत्तम उपनगर ठरणार आहे. तसेच हे राज्यातील सर्वोत्तम उदाहरण असेल. याबरोबरच प्रस्तावित पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या परिणामांमुळे रायगड प्रदेशात विक्रीला चालना मिळणार आहे.    – नयन शाह, अध्यक्ष, क्रेडाई एमसीएचआय