विकास आराखडा तयार : पायाभूत सुविधांसाठी ४ हजार ३०८ कोटी

पनवेल पालिकेचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून शहराच्या विकासासाठी सुमारे १०,५१४ कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. ७, १४ आणि २५ वर्षांचा विचार करून हा आराखडा तयार केला असून सोमवारी पनवेल पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्याचे सादरीकरण होणार आहे.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात शहर विकास आराखडा बनविण्याचे काम ‘मेसर्स क्रिसिल रिस्क अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्स सोल्यूशन लिमिटेड’ या कंपनीला देण्यात आले होते.

या अहवालानुसार सर्वाधिक खर्च सामाजिक, पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी तब्बल ४ हजार ३०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षण, आरोग्य, उद्यान व करमणुकीसाठी विशेष तरतूद केली आहे. पनवेल शहर व परिसरात असणाऱ्या सांस्कृतिक व धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश असणार आहे. पनवेल हे व्यापारी व नागरीकरणाचे महत्त्वाचे बेट असल्याने व शहरालगत असणाऱ्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे येथील प्रशस्त रस्ते, वाहतूक व्यवस्था व परिवहनाला या अहवालामध्ये प्राधान्य देण्यात आले असून यासाठी २ हजार ३४४ कोटी रुपयांची तरतूद आहे. शहर हे सायबर सिटी व अत्याधुनिक बनत असल्याने येथील स्वच्छतेवर विशेष लक्ष देत या अहवालामध्ये सांडपाणी व स्वच्छतेसाठी १ हजार ५० कोटी, तर पाणीपुरवठय़ासाठी तब्बल ४०० कोटी रुपयांचे अंदाज बांधण्यात आला आहे. विशेष म्हणजे एवढय़ा निधीच्या खर्चानंतर पनवेलकरांना पुरेशे पाणीपुरवठा होईल.

पावसाळी व सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी पालिकेने ४२२ कोटी रुपयांची तरतूद करण्याचे दर्शविले आहे. काही वर्षांनी नागरी घनकचरा हा सामाजिक प्रश्न होण्याचे संकेत ध्यानात घेऊन घनकचऱ्याचे विल्हेवाट आणि त्यावरील प्रक्रियेसाठी साडेचारशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित दाखविण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी ६८५ कोटी आणि गृहप्रकल्प उभारणीसाठी पावणेआठशे कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

अहवालातील ही सर्व आकडेवारी सोमवारी सर्वसाधारण सभेत पालिका सदस्यांसमोर मांडण्यात येईल. त्यांच्या मंजुरीनंतर त्यावर पालिका अंमलबजावणी करणार आहे.