लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : वाहन भाडेतत्त्वावर लावून देतो असे सांगून परस्पर विक्री करीत वाहनमालकांची फसवणूक केल्याचा आणखी एक गंभीर प्रकार नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी राज्यातील सर्वात मोठी कारवाई केली असून १८१ वाहन फसवणुकीच्या गुन्ह्य़ांची उकल करीत पाच आरोपींना अटक केली आहे.

यात परस्पर विकलेल्या २९ वाहनांचा शोध लागला असून नवी मुंबई पोलिसांनी २ कोटी २ लाख रुपये कीमतीच्या २० कार आतापर्यंत जप्त केल्या आहेत, तर नऊ कार गुजरात पोलिसांनी जप्त केल्या असल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अयान ऊर्फ राहुल अँथोनी पॉल छेट्टीयर हा या टोळीतील सूत्रधारासह सत्यप्रकाश मिठाईलाल वर्मा ऊर्फ बाबू, आशीष गंगाराम पुजारी, मोहम्मद वसीम मोहम्मद फरीद शेख आणि जावेद अब्दुल सत्तर शेख ऊर्फ मामा या आरोपींना अटक केली आहे.

आरोपींनी नेरुळ येथे एक आलिशान ‘ट्रॅव्हल्स पॉइंट’  नावाने कार्यालय थाटले होते. या ठिकाणी कार भाडेतत्त्वावर मिळत होत्या. मात्र हा व्यवसाय एक दिखावा होता. कार भाडेतत्त्वावर लावून देण्यात येतील आणि चांगला मोबादला मिळेल, असे आमिष वाहनमालकांना दाखवत होते. मात्र चार-पाच महिन्यांत हे कार्यालयच बंद झाल्यानंतर फसवणूक झाल्याच्या नऊ तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या.

या प्रकरणाचा सह पोलीस आयुक्त बी. जी. शेखर यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू होता. आरोपींचे मोबाइल बंद होते. मात्र आरोपी सत्यप्रकाश याची पत्नी भोईसर येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना खबरींकडून मिळाली. तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी पोलिसांनी ती राहात असलेल्या इमारतीतच घर भाडेतत्त्वावर घेतले. २४ तास पाळत ठेवल्यानंतर सातव्या (६ नोव्हेंबरला) दिवशी सत्यप्रकाश पोलिसांच्या हाती लागला. त्याने गुन्ह्यची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसाार टोळीचा सूत्रधार बेंगलूरु येथे एका हॉटेलमध्ये राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी जात सापळा लावला. आरोपीची खात्री करण्यासाठी वेटर म्हणून पोलिसांनी त्याच्या खोलीत प्रवेश केला. खात्री पटल्यानंतरही या ठिकाणी दोन आरोपींना (७ नोव्हेंबर) अटक केली.  या तिघांच्या अटकेनंतर त्यांना आतापर्यंत १८१ वाहनमालकांची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्यानंतर गुजरात येथून इतर दोन आरोपींना (१९ नोव्हेंबर) अटक करण्यात आली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, ज्ञानेश्वर भेदोडेकर, नीलेश तांबे, पोलीस अंमलदार संजय पवार, उर्मिला बोराडे, लक्ष्मण कोपरकर, राहुल वाघ, विजय खरटमोल यांच्या पथकाने केली आहे.

गुजरातमध्ये परस्पर विक्री

आरोपी विविध माध्यमांचा वापर करीत वाहन मालकांशी संपर्क साधत, करार करीत गाडी भाडेतत्त्वावर लावून देतो असे आमिष दाखवत. सुरुवातीला काही महिने वाहनमालकांना भाडे दिलेही जात असे. नंतर कार्यालयच बंद करून ते परागंदा होत. त्यांनी दिंडोशी, आंबोली, आझाद मैदान पोलीस ठाणे,  विरार, नेरुळ, मरोळ, अंधेरी, पुण्यात येरवडा आदी ठिकाणी कार्यालय थाटून फसवणूक केली आहे. येरवडा येथून सर्वाधिक ७९ वाहनमालकांची फसवणूक झाली आहे. आरोपी या वाहनांची स्वस्तात गुजरातमध्ये विक्री करीत होते. हे काम मोहम्मद वसीम मोहम्मद फरीद शेख आणि जावेद अब्दुल सत्तर शेख ऊर्फ मामा हे दोन आरोपी काम असत. सुरत, बलसाड, दमण, वापी, अहमदाबाद या ठिकाणी त्यांनी या वाहनांची विक्री केली आहे.