देखाव्यांतून समाजप्रबोधन; पर्यावरणपूरक गणेशोत्सवास प्राधान्य

प्रदूषणाचे अनेक तोटे दिसून येत असल्याने पर्यावरणाविषयी जागरूकता वाढते आहे. गणेश मंडळांनीही पर्यावरणपूरक गणेशमूर्तीसह देखावे उभारले आहेत. तसेच काही मंडळांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत काही महत्त्वाच्या समस्यांवर भक्तांचे प्रबोधन देखाव्यांतून करण्याचा प्रयत्न केला आहे. यात मोबाइलचे फायदे-तोटे यांसह पाण्याचे महत्त्वही पटवून देण्यात आले आहे. हे देखावे पाहण्यासाठी भक्तांची गर्दी वाढत आहे.

तुर्भे येथील शिवछाया मित्रमंडळाने मोबाइल- माणसांना जीवघेण्या आजारांमध्ये अडकविण्याची फॅक्टरी असा देखावा साकारला आहे. मोबाइलच्या दुष्परिणामांची जाणीव यातून करून देण्यात आली आहे. मोबाइलच्या रेडिएशनमुळे लहान पक्षी शहरांतून गायब झाले असून ब्ल्यूटूथ, हेडफोनच्या अतिवापरामुळे अनेक तरुणांना बहिरेपणा आला आहे. समाजमाध्यमांमुळे घरातील माणसांचा संवाद कमी झाला आहे. रक्ताची नाती दुरावत चालली आहेत, याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे.

सीवूड वेल्फेअर असोसिएशनच्या गणेश मंडळाने जलसंवर्धनाचा विषय देखाव्यातून साकारला आहे. पाण्याचा वापर व बचत करण्याबरोबरच रेन वॉटर हार्वेस्टिंगचा देखावा साकारला आहे. त्यातून त्यांनी पाण्याचे महत्त्व पटवून दिले आहे. नेरुळ येथील लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीतर्फे ‘मोबाइल : शाप की वरदान’ हा देखावा साकारला असून समाजामध्ये होणारे विपरीत परिणाम तसेच मोबाइलच्या सकारात्मक बाबी चलचित्रांद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. याप्रमाणेच वाशी, सेक्टर १ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, व्यापारी संघ यांनी इंद्रमहल साकारला असून देखावा पाहण्यासाठी गणेशभक्त गर्दी करू लागले आहेत. तर वाशी, सेक्टर १७ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने उत्तराखंड बद्रीनाथ येथील शिवमंदिराचा आकर्षक देखावा साकारला आहे.

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

सामाजिक प्रबोधनाबरोबरच काही मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना केली आहे. नेरुळ येथील श्री भीमाशंकर सार्वजनिक उत्सव मंडळाने ‘पवित्रता तीच, परंपरा नवीन’ या हेतूने कागदापासून तयार केलेली १३ फूट उंचीची पर्यावरणाभिमुख गणेशमूर्ती साकारली आहे.  गेली ५० वर्षे मूर्तिकलेची परंपरा जपणारे सुप्रसिद्ध मूर्तिकार मोरेश्वर पवार यांनी ही साकारली आहे. ही मूर्ती बनविण्यासाठी कागद, लाकूड आणि जलरंगांचा वापर केला आहे. यामुळे जलप्रदूषणाला कोणताच धोका निर्माण होणार नाही. कोपरखैरणे, सेक्टर ४अ येथील श्री स्वामी समर्थ सार्वजनिक मंडळाने पर्यावरणपूरक चिकणमातीचा मोदक बनवून त्यापासून गणेशमूर्ती तयार करून घेतली आहे.