नवी मुंबई पालिकेच्या सर्व यंत्रणा सतर्क

भारतीय हवामान खात्याने ९ ते ११ जून दरम्यान कोकण विभागात दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनीही महापालिकेला योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. पनवेल आणि उरणमध्येही आपत्तीव्यवस्थापनासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

महापालिका मुख्यालयात वर्षभर कार्यरत असणाऱ्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राप्रमाणेच बेलापूर, नेरुळ, वाशी व ऐरोली येथील अग्निशमन केंद्रांच्या इमारतींत अहोरात्र आपत्कालीन नियंत्रण कक्ष साधनसामुग्री व मदतीसाठी आवश्यक मनुष्यबळासह यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आठही विभाग कार्यालयांत २४ तास मदत केंद्रे स्थापन केली आहेत. नवी मुंबईत करावे व साईवाडी, बेलापूर रेल्वे स्थानक परिसर, एनएल ४ बििल्डग सेक्टर १ नेरुळ, शिरवणे सबवे गणेश मंदिराजवळ, वाशी गाव, कोपरी गाव, शिवाजी चौक, सेक्टर ९ नूर मशीद, शबरी हॉटेल, आसाम भवन, इंदिरानगर, तुर्भे एमआयडीसी, तुर्भे पोलीस ठाणे, सानपाडा रेल्वे सबवे येथे पाणी साचण्याची शक्यता आहे. याशिवाय  एमटीएनएल एक्स्चेंज गेट, बदाम गल्ली, खाडी रोड कोपरखैरणे गाव, समतानगर बोनकोडे गाव,  गार्डन परिसर सेक्टर १ ते ४, रॉयल प्लास्टिकसमोर सेक्टर ४ ए, रा. फ. नाईक शाळेसमोर, रवींद्र म्हात्रे यांची चाळ, बाळाराम वाडी, हनुमान मंदिर पाटील आळी, कोळ्यांची आळी मोठे शेत, साई सदानंद नगर, सत्यवान नगर गोठवली, रामभरोसे हॉटेल, यादवनगर, रेल्वे सबवे सेक्टर ३ व ५, ब्रिजखाली सेक्टर १०, जय ग्रुप व बसडेपो सेक्टर ३, गणपतीपाडा, सुभाषनगर, बिंदुमाधवनगर, आंबेडकरनगर, कृष्णावाडी, कन्हैयानगर, इलठणपाडा, विजयनगर, विष्णूनगर येथे पाणी साचण्याची शक्यता विचारात घेऊन योग्य उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

अतिवृष्टीच्या अनुषंगाने व पावसाळ्यात कोणत्याही आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. पाणी साचण्याच्या संभाव्य १३६ ठिकाणी खबरदारी घेतली आहे. नागरिकांना सतर्कतेसंदर्भात संदेश पाठविण्यात येत आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त मोहन डगावकर यांनी दिली.

नवी मुंबई  पालिकेची तयारी

  • नियंत्रण कक्षांद्वारे मदतकार्य केले जाणार आहे.
  • नाल्याशेजारील, डोंगर उतारावरील व सखल भागांतील रहिवाशांनी या कालावधीत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. अन्यथा महानगरपालिकेकडून स्थलांतरित करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी सूचना देण्यात आली आहे.
  • ज्या परिसरांना धोका आहे, अशा ८० ठिकाणी सूचना फलक लावण्यात येत आहेत.
  • धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ३७८ धोकादायक आणि ५८ अतिधोकादायक इमारतींची पाहणी करण्यात आली आहे. विभाग अधिकाऱ्यांनी नोडल अधिकाऱ्यांसह या इमारतींची पुन्हा पाहणी व आवश्यक कार्यवाही करावी. त्या संदर्भातील अहवाल त्वरित सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

दरड कोसळण्याची ठिकाणे

रमाबाई आंबोडकरनगर, जय दुर्गानगर, संभाजीनगर, अर्बन हार्ट, रमेश कॉरी, महात्मा गांधीनगर एमआयडीसी, टेक्नो प्रीकास्ट कॉरी, एमआयडीसी नेरुळ, हनुमाननगर टेकडी, गणपती पाडा महावीर कॉरी, बोनसरी कॉरी, अमान्यस कंपनीमधील परिसर, चायना गार्डन सेक्टर १२ डी, सिद्धी बारसमोर, सेक्टर २, भारत मेडिकलसमोर खैरणे, एमएससीबी कार्यालय ते समाधान ऑफिस सेक्टर १९, अनंत वेटा यांच्या घरामागील परिसर कोपरखैरणे, निब्बाब टेकडी, आदिवासी कातकरी पाडा, साईबाबा नगर, चिंचपाडा, छत्रपतीनगर, डी मार्टसमोर, दिवा अंडर पास, हिंदुस्तान लिव्हर, टाइम्स ऑफ इंडिया, रिलायबल फॅशन जवळ, कन्हैयानगर, इलठणपाडा, विजयनगर, विष्णूनगर.

नागरिकांना आवाहन

  • मुसळधार पावसात आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडणे टाळावे. घराबाहेर पडण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून हवामान, रेल्वे व रस्त्यांवरील वाहतुकीची माहिती घ्यावी.
  • घराबाहेर असताना पाऊस थांबेपर्यंत पक्के घर अथवा इमारतीत आश्रय घ्यावा. विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाइल फोनवर संभाषण करू नये, विजेवर चालणाऱ्या उपकरणांपासून दूर रहावे.
  • अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नयेत.

टोल फ्री क्रमांक

  • १८००२२२३०९ /१८००२२३९१०

महापालिकेने आपत्कालीन स्थितीसाठी जय्यत तयारी केली आहे. शहरात जवळजवळ ६० ठिकाणी सूचना फलक लावण्यात येत आहेत. त्याचप्रकारे या कालावधीत संबंधित कर्मचारी व अधिकारी यांना रजा घेता येणार नाही. मुख्यालयाशी संबंधितांनी संपर्कात राहावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नमुंमपा