News Flash

संकरित बससेवेकडे प्रवाशांची पाठ

संकरित बससेवा देशात आणि राज्यात सर्वप्रथम नवी मुंबईत दाखल झाली.

नियोजन, वेळापत्रकाच्या अभावी बस तुर्भे आगारातच उभी; रंगरंगोटी व वातानुकूलित सेवाही निन्मदर्जाची

डिझेल आणि विद्युत बॅटरीवर चालणारी दक्षिण आशियाई देशातील पाहिली संकरित प्रवासी बस ‘एनएमएमटी’च्या ताफ्यात या वर्षीच्या सुरुवातीलाच दाखल झाली; मात्र या बससेवेला नवी मुंबईकरांनी फारच कमी प्रतिसाद दिला आहे. या बसची चाके तुभ्रे आगारात रुतून बसली आहेत. परिवहनने बस डेसारखा लाखो रुपये खर्चून जनजागृती उपक्रम घेतल्यांनतरही केवळ नियोजन आणि वेळापत्रकाच्या अभावी या सेवेला सुरुवात होऊ शकलेली नाही.

संकरित बससेवा देशात आणि राज्यात सर्वप्रथम नवी मुंबईत दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते या सेवेला हिरवा कंदील मिळाल्यानंतर ही सेवा नवी मुंबईकरांसाठी रुजू झाली. तुभ्रे आगारात ही बस दाखल झाल्यांनतर तिची चाचणी घेण्यात आली. शहरातील रस्त्यांच्या कागदोपत्री चाचणी परीक्षेत संकरित बसने बाजी मारली. मात्र परिवहन प्रशासनाच्या नियोजनामुळे आणि वेळापत्रकाअभावी ही बस रस्त्यावर फारच कमी धावली.

प्राथमिक स्वरूपात वाशी रेल्वे स्टेशन ते मिलेनियम बिझनेस पार्क या मार्गावर चाचणी घेण्यात आली; मात्र या बसची रंगरगोटी आणि वातनुकूलित सेवा पाहता या मार्गावरदेखील या बसला धावणे शक्य झाले नाही. त्यांनतर परिवहन प्रशासनाने इतर वातानुकूलित व्होल्वो बस मार्गावर वांद्रे ते बोरिवलीपर्यंत दुसऱ्या टप्प्यात चाचणी घेण्यात आली.

या मार्गावरही बसला कमी प्रतिसाद मिळाला. दरम्यान एनएनएमटीने बस डेच्या निमित्ताने शहरात सदैव तत्पर असल्याचे सांगत एनएमटीनेच प्रवास करावा यासाठी पथ नाटय़ातून त्याचबरोबर पत्रकांतून जनजागृती केली होती. मात्र त्यानंतरही हायब्रीडसारख्या अभिनव योजनेला त्याचा लाभ होऊ शकला नाही.

अधिकांऱ्याना वेळ नाही

संकरित सेवा शहरात इतरत्र सुरू करण्यासाठी प्रवाशांकडून मागणी करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. बस दाखल झाल्यानंतर तीन महिन्यांत मार्गाचे आणि वेळापत्रकांचे नियोजन करण्याचे प्रशासनाने सूचित केले होते; मात्र आठ महिने उलटूनही ही बस कोणत्या मार्गावर कायम सुरू करण्याचा निर्णय झाला नसल्याचाही फटका बसला आहे.

परिवहनच्या सेवेत दाखल झालेल्या संकरित बसची दोन ते तीन टप्प्यांत चाचणी घेण्यात आली. येत्या काही दिवसांत प्रवाशांकडून सूचना मागवून मार्ग आणि वेळापत्रक ठरविण्यात येईल.

शिरीष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 1:13 am

Web Title: hybrid buses issue
Next Stories
1 कुटुंबसंकुल : शांत, शीतलतेचा आवास
2 खारघरच्या ‘गोल्फ कोर्स’चा कायापालट
3 उरणमध्ये दोन शासकीय सिनेमागृहांसह नाटय़गृह
Just Now!
X