नऊ दिवसांत ६४३७ बाधित; ५३ जणांचा मृत्यू

पनवेल : करोना रुग्णविस्फोट होत असल्याने राज्य शासनाने गेल्या आठवड्यात संचारबंदी लागू करीत कडक निर्बंध लागू करण्यात आले. यामुळे शेजारील नवी मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या कमी झाली असली तरी पनवेलमध्ये मात्र रुग्णवाढ कायम आहे. नऊ दिवसांत ६ हजार ४३७ जण बाधित झाले असून ५३ जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईतील लोकसंख्या १५ लाख तर पनवेल तालुक्याची लोकसंख्या १२ लाख असताना नवी मुंबईपेक्षा पनवलमध्ये रुग्णवाढ कायम असल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यात येथील आरोग्य व्यवस्थाही तोकडी असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

पनवेलमध्ये सध्या ६,१४७ करोना रुग्ण हे उपचार घेत आहेत. असे असताना आपुरी आरोग्य व्यवस्था, लसींचा तुटवडा व प्राणवायूंचा तुटवडा भासतआहे. त्यात दैनंदिन करोना रुग्णवाढ कायम असल्याने शहराचा धोका वाढला आहे.

पनवेल पालिकेत मुळात मनुष्यबळ अपुरे आहे. उपलब्ध मनुष्यबळावर येथील आरोग्य व्यवस्था चालविली जात आहे. ग्रामीण पनवेलची आरोग्य व्यवस्था रायगड जिल्ह्याच्या प्रशासनाकडे आहे. ग्रामीण भागातही घरोघरी करोनाची लक्षणे असणाऱ्यांची शोधमोहीम व करोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांची शोधमोहीम प्रभावीपणे राबविल्या गेली नाही. उलट करोना चाचणीचे अपुरे संच अशा विविध समस्यांना येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामीण पनवेलमध्ये वैद्यकीय मोबाइल सेवा अद्याप सुरू झालेली नाही. नवी मुंबई पालिकेकडून  २४ तास लसीकरण सेवा व करोना चाचणीची मोहीम विविध केंद्रांवर राबवली जात आहे.

औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची करोना चाचणी नवी मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे. परंतु पनवेल पालिका व महसूल विभागाकडून असे उपक्रम राबविले जात नाहीत. उलट कारखानदारांनीच ही जबाबदारी स्वीकारावी असे प्रशासनाचे मत आहे

पनवेलमध्ये एकाच दिवसात १९ जणांचा मृत्यू

पनवेल शहर पालिका क्षेत्रात गुरुवारी एकाच दिवसात करोनामुळे १९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत पनवेल तालुक्यातील ९३१ जणांचा मृत्यू झाला असून ५९,३८० जणांना करोनाची लागण झाली आहे. गुरुवारी तालुक्यातील ७५१ जण करोना बाधित आढळले.