आपत्ती व्यवस्थापनात सामाजिक अंतराचा फज्जा

नवी मुंबई : शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच बुधवारी खाडीकिनारी असलेल्या नवी मुंबईला वादळी वाऱ्याने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे दिवा ते दिवाळ्यापर्यंतच्या आठ प्रभाग क्षेत्रांतील एक हजारापेक्षा जास्त रहिवाशांना पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला सुरक्षित स्थळी हलवावे लागले. या स्थलांतरित नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्थादेखील पालिकेने केली असून जेवणाबरोबर मुखपट्टीचे वाटप करावे लागले. या आपत्ती व्यवस्थापनात करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर मात्र पाळता आले नसल्याचे स्पष्ट दिसून येत होते.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निर्सग चक्रीवादळाचा केंद्रबिंदू हा रायगड असल्याने आजूबाजूच्या परिसराला शासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला होता. त्यामुळे पनवेल नवी मुंबई पालिकेने मंगळवारपासून या चक्रीवादळाला कसे तोंड देता येईल याची तयारी केली होती. बुधवारी दुपारी झालेल्या वादळात बेलापूर, नेरुळ, तुर्भे आणि ऐरोली या चार उपनगरांतील एक हजार १०० रहिवाशांना दरड, वृक्ष, विजेच्या तारा कोसळण्याच्या शक्यतेने जवळच्या शाळा, समाज मंदिर या सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. नवी मुंबईच्या खाडीकिनारी अनेक बैठी घरे व झोपडय़ा वसलेल्या आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी हलविताना रहिवाशांना सकाळचा अल्पोपाहार आणि दोन वेळचे जेवणदेखील पालिकेच्या वतीने देण्यात आले. या स्थलांतरित नागरिकांमध्ये लहान मुले आणि वृद्ध रहिवाशीदेखील होते. टाळेबंदीत घरात राहणारे बहुतांशी रहिवाशी मुखपट्टी वापरत नसल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जेवणाबरोबरच मुखपट्टीचेदेखील वाटप केले, मात्र जेवणाची पंगत बसविण्यात आल्याने सामाजिक अंतराचे पालन करता आले नसल्याचे दिसून आले. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी पालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्यासह सर्व यंत्रणा गेली दोन दिवस रस्त्यावर उतरली होती. या नवीन संकटामुळे करोना रोगाचा प्रार्दुभाव वाढण्याची भीती आहे.

 

‘त्या’ २५ कलाकारांची वादळानिमित्त व्यवस्था

ऐरोली सेक्टर दहामधील मोकळ्या मैदानावर एप्रिल महिन्यात तंबू ठोकण्यात आलेल्या रेनबो सर्कसमधील २५ महिला कलाकार, दोन लहान मुले, आणि पाच पुरुष कलाकारांवर टाळेबंदीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. मध्यंतरी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना अन्नधान्याची मदत केली, मात्र मंगळवारच्या चक्रीवादळाने त्यांच्या जीवनात एक नवीन वादळ आल्याने त्यांची पंचाईत झाली होती. पालिकेने या सर्व कलाकरांची सेक्टर १४ मधील शाळेत राहण्याची व जेवणाची व्यवस्था केल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.