|| पूनम धनावडे

नवी मुंबईतील विविध दूधसंघांकडे केवळ एक दिवसापुरताच साठा उपलब्ध

राज्यभरात दूध आंदोलन दिवसेंदिवस चिघळत असून त्याचा परिणाम शहरातील दूध पुरवठय़ावर होत आहे. आंदोलन काळात दुधाचा तुडवडा भासू नये याकरिता नवी मुंबईतील विविध दूधसंघांत आधीच अतिरिक्त साठा करून ठेवण्यात आला होता, परंतु आंदोलन सुरूच असल्याने जवळपास सर्वाकडेच आता केवळ एक दिवसाचा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नवी मुंबईसह मुंबई उपनगरांत दुधाची कमतरता भासण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वाशीतील वारणा दूध संघ नवी मुंबईसह मुंबई, रायगड, ठाण्यात दूध पुरवठा करतो. त्यांच्याकडून रोज दीड ते दोन लाख लिटर दूध पुरवठा केला जातो. मुंबईला दररोज ७० हजार ते ८० हजार लीटर दुधाचा पुरवठा केला जातो. सोमवारपासून आंदोलन सुरू होणार असल्यामुळे नवी मुंबई वारणा संघाने रविवारी तीन ते साडेतीन लाख लीटर दूधसाठा करून ठेवला होता. दूध आंदोलन अधिक व्यापक होत असून वारणा संघाकडे एक दिवस पुरेल इतका १ लाख ते २ लाख लिटर साठा उपलब्ध आहे, अशी माहिती संघाचे व्यवस्थापक एस. एम. पाटील यांनी दिली. आंदोलन उद्याही सुरू राहिले तर शहरात दूधटंचाई भासेल, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. नवी मुंबई वारणा दूध संघाला कोल्हापूरहून दूध पुरवठा केला जातो. कोल्हापूर वारणा दूध संघाला पश्चिम महाराष्ट्रातून दूध उपलब्ध होते. मात्र दूध आंदोलनामुळे पुरवठय़ावर परिणाम झाला आहे.

गोकुळ दूध संघ दररोज नवी मुंबईसह मुंबई, ठाणे रायगड भागांत ७ लाख लिटर दूध पुरवठा करतो. रविवारपासून त्यांनी देखील दूध संकलन करून ठेवले होते. एक टँकर ३०-३५ हजार लिटरचा असून असे १६ टँकर गोकुळ दूध संघात दाखल झाले आहेत, मात्र हा साठा बुधवापर्यंत पुरेल असे सांगण्यात येत आहे. दूध संघाला सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद, सातारा, सांगली, बारामती, इंदापूर, गुजरात, जळगाव, कर्नाटक या भागातून सुटय़ा दुधाचा पुरवठा होतो.

महानंद दूध संघाकडून नवी मुंबई सह मुंबई, ठाणे या विभागांत दररोज १ लाख ८५ हजार लीटर दूध पाठवले जाते. सोमवारी या संघाकडून १ लाख ९३ हजार लीटर दुधाची विक्री करण्यात आली. ८ हजार लिटर अतिरिक्त दुधविक्री झाली. मंगळवारी महानंदकडे ६० ते ६५ हजार लिटर दूध दाखल झाले होते. त्यांना नगर, बीड, औरंगाबाद, अकलूज, सांगली, पुणे, सिन्नर, संगमनेर या भागांतून दूध पुरवठा होतो. आधीचे दूध शिल्लक असल्याने अद्याप दुधाचा तुटवडा भासलेला नाही. परंतु पुढील कालावधी दूध पुरवठा कसा होतो यावर स्थिती अवलंबून असल्याचे महानंद संघाने सांगितले.

कोल्हापूर वारणा दूध संघाला रोज होणाऱ्या दूध पुरवठय़ात घट झाली आहे. आंदोलन सुरू असले तरी रोज दुधाची नासाडी कशी करायची या विचाराने इतर भागांतील ७० ते ७५ टक्के दूध उत्पादक खासगी वाहनांतून वारणा संघाला दूध पुरवठा करत आहेत.     – राजेंद्र महाजन, दैनिक व्यवस्थापक, वारणा दूध संघ, कोल्हापूर