पहिल्या उड्डाणाला तीन वर्षांचा अवकाश; कंत्राटदार बदलामुळे विलंब

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : विमानतळ उभारणीच्या कंत्राटदारात झालेला बदल, करोना साथ रोग आणि त्यामुळे होणारा विलंब यामुळे नवी मुंबई विमानतळाचे पहिले उड्डाण आता तीन वर्षे लांबणीवर गेले आहे. राज्य शासनाने या उड्डाणाचा मुर्हत डिसेंबर २०२० जाहीर केला होता.

मुंबई विमानतळाचे संचालन अदाणी उद्योग समूहाने हस्तांतरित करून घेतल्याने जीव्हीके लेड बांधकाम कंपनीच्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीकडे असलेले नवी मुंबई विमानतळ उभारणीचे काम आता अदाणी उद्योग समूह करणार आहे. या सर्व हस्तांतरण प्रक्रियेला आणखी काही काळ लागणार आहे. त्यामुळे धावपट्टी, टर्मिनल उभारणीसाठी अडीच वर्षे लागणार असल्याचे सिडको उच्च अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गेली २३ वर्षे नवी मुंबई विमानतळाची चर्चा सुरू आहे. दहा वर्षांपूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळाल्यानंतर या प्रकल्पाला वेग आला होता. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या कामाचा शुभांरभ झाला. १६ हजार कोटी रुपये खर्चाचे हे काम पाच निविदाकारांच्या स्पर्धेत जीव्हीके लेड या कंपनीला मिळाले होते. मुंबई विमानतळाचे संचालक जीव्हीके कंपनी करीत असल्याने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील दुसऱ्या विमानतळाच्या कामात त्यांना प्राधान्य देण्याचा करार झाला होता. त्यानुसार या कंपनीला हे काम प्रधान्यक्रमाने देण्यात आले. मात्र गेली दोन वर्षांत या कंपनीची खालावलेली आर्थिक स्थितीमुळे कंपनीला कामासाठी कर्ज मिळणे दुरापास्त झाले होते. याच वेळी या कंपनीच्या मुंबई व हैद्राबाद कार्यालयावर छापे पडल्याने या कंपनीचा पाय अधिक खोलात गेला व त्यांनी ७४ टक्के भाग भांडवल अदाणी उद्योग समूहाला विकले आहे. त्यामुळे आता ही कंपनी नवी मुबंई विमानतळाचा विकासदेखील करणार आहे.

हा तिढा सहज सुटणारा नाही. केंद्रात भाजपा सरकार असून राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळे जीव्हीकेला मिळालेले काम अदाणीला हस्तांतरण करण्याची प्रक्रिया इतक्या सहज होणे शक्य नाही. महाविकास आघाडीने या हस्तांतरण प्रक्रियेला खोडा घातल्यास या कामाची फेर निविदा काढण्याची वेळही येऊ शकते, असे सिडकोच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले. विमानतळ उभारणीच्या कामाचा प्रश्न सुटल्यानंतर पुढील दोन ते तीन वर्षे धावपट्टी व टर्मिनल या कांमांना वेळ द्यावा लागणार असल्याने नवी मुंबई विमानतळाचे काम तीन वर्षांने लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.