१०० मीटर उंच इमारतींसाठी अवघ्या ६८ मीटरची शिडी

शेखर हंप्रस, नवी मुंबई</strong>

नवी मुंबईत उतुंग इमारती बांधण्यास परवानगी दिली जात आहे, मात्र या इमारतींना आग लागली तर ती कशी विझवावी या प्रश्नाचे उत्तर पालिकेकडे नाही. सध्या नवी मुंबईत १०० मीटरपेक्षा जास्त उंच इमारतींना परवानगी दिली जात आहे, मात्र पालिकेच्या अग्निशमन दलाची शिडी केवळ ६८ मीटरचीच आहे. त्यामुळे एखाद्या गगनचुंबी इमारतीत आग लागल्यास नियंत्रण कसे मिळवायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

१३ जून रोजी मुंबईतील प्रभादेवी येथे ब्यूमोंड या उतुंग इमारतीच्या ३३व्या मजल्यावर आग लागली होती. ती विझवताना अग्निशमन यंत्रणेतील त्रुटी चव्हाटय़ावर आल्या. त्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईतील उभ्या राहिलेल्या आणि परवानगी दिल्या गेलेल्या गगनचुंबी इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. नवी मुंबईत मुख्यत्वे एनआरआय फेज-२ तसेच घणसोली नोडमध्ये सर्वाधिक उंच इमारती आहेत. घणसोलीमध्ये शहरातील सर्वात उंच इमारती उभ्या असून त्यांची उंची १०० मीटरपेक्षा जास्त आहे. १०० मीटरच्या म्हणजे ३३-३४ मजली इमारती उभ्या असताना अग्निशमन दलाकडे असणारी ब्रांटो गाडीची सर्वात उंच शिडी ६८ मीटरचीच आहे. म्हणजे ही शिडी केवळ २२ ते २३ मजल्यापर्यंतच पोहोचते.

स्वतंत्र यंत्रणा कुचकामी

* शहरात अतिउंच इमारतींना स्वत:ची अग्निशमन यंत्रणा उभी करणे अनिवार्य करण्यात आले आहे, मात्र जेव्हा आग लागते तेव्हा दर वेळी आग विझवण्यासाठी पालिकेच्या अग्निशमन दलालाच धाव घ्यावी लागते. अशा वेळी इमारतीची अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचे किंवा बिघडल्याचे निदर्शनास येते. अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे इमारतींच्या स्वतंत्र अग्निशमन यंत्रणेविषयी शंका उपस्थित करण्यात येत आहेत.

*  शहरातील बहुतेक इमारतींतील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नाही, अशी कबुलीही नवी मुंबई पालिकेने वेळोवेळी दिली आहे. इमारतींनी अग्निसुरक्षा परीक्षण करून घ्यावे, असे आवाहन करणारे पत्रक पालिकेकडून प्रसिद्ध केले जाते, मात्र इमारती त्याला नेहमीच केराची टोपली दाखवतात. पालिकेने अग्निसुरक्षा नियम न पाळणाऱ्या इमारतींवर कठोर कारवाई केल्याचे एकही उदाहरण नाही.

नवी मुंबईत सध्या घणसोली परिसरात सर्वाधिक उंच इमारती उभ्या आहेत. सुमारे १०० मीटर उंचीच्या इमारती उभारल्या जात आहेत. त्यांना अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे.

– ओवेस मोमीन, साहाय्यक संचालक नगररचना, नमुंमपा

अग्निशमन दलातीर सर्वात उंच शिडी जास्तीत जास्त २२ मजल्यापर्यंत पोहोचू शकते. त्यापेक्षा उंच इमारतींनी स्वत:ची अग्निशमन यंत्रणा उभी केली आहे की नाही हे पाहून त्यांना ना  हरकत प्रमाणपत्र दिले जाते.

– जे. टी. पाटील, प्रभारी केंद्र अधिकारी, अग्निशमन दल