शनिवारपासून सुरू होण्याची शक्यता; २४ तासांत एक हजार चाचण्यांचे लक्ष्य

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई</strong> : करोना चाचणी अहवाल उशिराने प्राप्त होण्याचे प्रकार समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नेरुळमध्ये पालिकेची स्वतंत्र चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवापर्यंत ही प्रयोगशाळा सुरू करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चाचणी अहवाल मिळण्यासाठी पाच ते आठ दिवसांचा कालावधी लागत असल्याने संशयित बाधित आहे की नाही, हे कळण्यास वेळ लागत होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू करण्यास उशीर होत होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन करोनाची साखळी तोडण्यात अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यामुळे शहरात ‘आयसीएमआर’ची परवानगी असलेल्या सात खासगी   प्रयोगशाळांना चाचणीसाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे काही स्वॅब शहरात तर काही स्वॅब जे. जे रुग्णालयात पाठवले जात होते. याचा मोठा फटका नागरिकांना सहन करावा लागत होता.

सुरवातीला एका खासगी संस्थेच्या मदतीने वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात प्रयोगशाळा सुरु करण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याला तत्कालीन आयुक्त मिसाळ यांनी नकार दिला होता.

त्यानंतर शहरात वाढणारी करोना रुग्णांची संख्या आणि चाचणी अहवालाचा विलंब यामुळे आमदार गणेश नाईक यांनीही आयुक्तांकडे पालिकेची स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्याचा आग्रह मिसाळ यांच्याकडे धरला होता. परंतु, विलंबानंतर मिसाळ यांनी पुण्यातील एका खासगी संस्थेच्या मदतीने प्रयोगशाळा तयार करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यानंतर मिसाळ यांची शहरातील करोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याने तडकाफडकी बदली झाली.

त्यानंतर कार्यभार स्वीकारलेल्या अभिजीत बांगर यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत शहरासाठी लवकरात लवकर प्रयोगशाळा निर्माण करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बांगर यांनी मिसाळ यांनी खासगी संस्थेच्या मदतीने पालिकेची करोना चाचणी प्रयोगशाळा करण्याचा प्रस्ताव रद्द करुन पालिकेची स्वतंत्र प्रयोगशाळा निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नेरुळ येथील पालिका रुग्णालयात शहरातील महापालिकेची पहिली स्वतंत्र करोना चाचणी प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेसाठी आवश्यक साहित्य  प्राप्त झाले आहे. याच आठवडय़ात ही प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहे. शहरात खासगी प्रयोगशाळांमधील अहवालावरुन साशंकता निर्माण झाल्याने थायरोकेअरला पालिकेने बंदी घातली आहे. तसेच चाचणी अहवालात विसंगती आल्याने अहवालाबाबत नागरीकांमध्ये साशंकता असताना पहिली स्वतंत्र करोना चाचणी प्रयोगशाळा सुरू होणार आहे.

नाईक यांच्या प्रयत्नांना यश

पालिकेची स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करावी यासाठी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी  सातत्याने पाठपुरावा केला होता. नेरुळ येथे स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्यात यावी यासाठी त्यांनी तत्कालीन आयुक्तांकडे आग्रह धरला होता. शहरातील अधिकाधिक नागरिकांची चाचणी करता येणे सुलभ होईल. तसेच उशिरा चाचणी अहवाल मिळाल्यामुळे  नागरिकांची होणारी फरफट थांबेल, असेही त्यांनी सातत्याने पालिका प्रशासनासमोर मांडले होते

प्रयोगशाळेसाठी आवश्यक साहित्य व मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे. २४ तासांत १००० चाचण्या करण्यात येईल असे लक्ष्य ठेवण्यात आले आहेत. लवकरच चाचणी प्रयोगशाळा कार्यन्वित करण्यात येणार आहे.

        -अभिजीत बांगर, पालिका आयुक्त