लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : प्रतिजन किंवा आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने गोळा न केलेल्या नागरिकांचेही करोना निदान अहवाल तयार केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबई महापालिकेत उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमली असून सखोल व नि:पक्षपातीपणे चौकशी करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

चाचण्यांचा आकडा फुगवण्यासाठी हा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर आर्थिक उद्देशाने हा प्रकार झाला नसून संगणक चालकांच्या नोंदणीतील चुकांमुळे हा प्रकार घडला असल्याचा दावाही पालिका प्रशासनाने केला आहे. तीन जणांची चौकशी समितीत एक उपायुक्त, साहाय्यक आयुक्त व लेखा अधिकारी यांचा समावेश आहे. त्यांना तीन लाख नागरिकांच्या करण्यात आलेल्या प्रतिजन व आरटीपीसीआर चाचण्यांची तपासणी करण्यास सांगितले असून लवकरात लवकर अहवाल देण्यास सांगितले आहे.

चाचणी करण्यापूर्वी एक नोंदणी अर्ज भरून घेतला जात आहे. यात चाचणी करणाऱ्या संशयितासह त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांची नावे नोंद केली जात आहेत. जर संशयिताचा अहवाल सकारात्मक आला तर संपर्कात आलेल्यांना संपर्क साधून चाचणी करून घेण्यासाठी सांगितले जात असते. तसेच अहवाल नकारात्मक आला तर नोंदणी अर्जावरील माहिती संगणक चालकांकडून संगणकात भरली जात होती. करोनाच्या आरटीपीसीआर चाचण्यांत कोणतीही गडबड नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

परंतु प्रतिजन चाचण्यांची माहिती संगणक चालकांकडून नोंदणी करताना चाचणी केलेल्या नागरिकासह  कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावांचीही नोंदणी आयसीएमआरच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. त्यामुळे चाचणी न करताच अहवाल नकारात्मक असल्याची नोंद झाली आहे. तसेच नोंदणी अर्जात काहींनी कुटुंबातील मृत व्यक्तींचीही नावे भरली गेल्याने त्यांचाही अहवाल नकारात्मक असल्याची नोंद झाली आहे. प्रतिजन चाचण्यांसाठी आलेले किट, प्रत्यक्ष तपासणी करण्यात आलेले नागरिक व शिल्लक किटची संख्या जुळत असल्याने प्रथमदर्शनी आर्थिक उद्देशाने प्रकार झाला नसल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.

माहिती तपासण्यात हलगर्जी

पालिकेते चाचण्यांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. संगणक चालकांकडून आयसीएमआरकडे माहिती भरल्यानंतर ती तपासणी करणे गरजेचे होते. मात्र त्यात हलगर्जीपणा झाला असल्याचे पालिकेने मान्य केले आहे. अंदाजे ७ ते ८ हजार चुकीच्या नोंदी झाल्या असल्याची शक्यता आहे. या संदर्भात तक्रार आल्यानंतर ही नोंदणी बंद करण्यात आली आहे.