|| शेखर हंप्रस

सार्वजनिक शौचालयांचीही दुरवस्था; पालिकेकडे महसुली हस्तांतरणाची मागणी

नवी मुंबई : दिघ्यात सहा प्रभाग मिळून केवळ एकाच उद्यान आहे. सुसज्ज असे मैदान नाही. दैनंदिन बाजाराचे नियोजन असल्याने फेरीवाल्यांचा प्रश्न आहे. विरंगुळा केंद्र, नाही, नागरी आरोग्य केंद्रही एकच असून ते ‘असून अडचण नसून खोलंबा’ आहे. एकही राष्ट्रीयकृत बँक नसल्याने येथील रहिवाशांना कळवा किंवा ऐरोलीत जावे लागते. तीन सार्वजनिक शौचालये असून त्यांचीही दुरवस्था झाली आहे.

नवी मुंबईतील ‘आजारी’ विभाग असा उल्लेख दिघा विभागाचा केला जातो. या विभागात मिश्र लोकवस्ती असून झोपडपट्टीबहुल आहे. काही इमारती आहेत, त्यातील बहुतांश बेकायदा आहेत. त्यामुळे दिघा विभाग पालिकेकडे महसुली हस्तांतरित करावा आणि एमआयडीसीने त्यावरील हक्क सोडावा; तरच विकासाची गंगा आमच्यापर्यंत पोहचेल अशी खंत या विभागातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

वास्तविक हा विभाग ठाणे बेलापूर औद्योगिकपट्टय़ात येतो. ठाणे-बेलापूर महामार्ग झाल्यानंतर या विभागाचे दोन भाग झाले आहेत. प्रभाग तीन आणि नऊ महामार्गाच्या एका बाजूला तर अन्य प्रभाग दुसऱ्या बाजूला आहेत. येथील यादवनगर (प्रभाग ६), चिंचपाडा (प्रभाग ७ ) आणि गवतेवाडी (प्रभाग ८) हे ऐरोली विभागात येतात.

दिघा विभागात अधिकृत बांधकाम शोधावे लागते असे गमतीने म्हटले जात असले तरी ते वास्तव आहे. नवी मुंबईची निर्मिती होत असताना दिघा गावाच्या आसपास इंग्रज काळापासून असलेली गायरान (गुरुचरण सध्या आद्य्ोगिक वसाहतीच्या मालकीची जमीन) जमिनीवर मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली.

कळवा, ठाण्यातून अनेक भूमाफियांनी या ठिकाणी बेकायदा इमारती उभारून त्यातील सदनिका विकून ते परागंदा झाले. त्यामुळे या ठिकाणी बेकायदा बांधकामांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अरुंद रस्ते, पार्किंगची गैरसोय होत आहे.

दिघा विभाग मागासला राहण्यात महत्वाची अडचण आहे ती जागा. हा परिसर औद्योगिक वसाहतीत असल्याने जागेवर मालकी हक्क हा औद्योगिक वसाहतीचा तर काही भाग हा वन विभागाचा आहे. त्यामुळे कोण्त्याही विकास कामासाठी जाग हवी असेल तर या दोत विभागाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.  पालिकेकडूनही यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे या परिसराचा विकास थांबलेला आहे.

राजकीय चित्र

पक्षीय बलाबल पाहता दिघ्यात केवळ प्रभाग १ मध्ये भाजप नगरसेवक निवडून आले आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य होते. मात्र गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी भाजपचे कमळ हाती घेतले. यात नवीन गवते, दीपा गवते, आणि अपर्णा गवते यांचा समावेश आहे. शुभांगी गवते, जगदीश गवते (प्रभाग २ आणि ५) हे  शिवसेना नगरसेवक आहेत. विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांच्यावर पक्षाने येथील जबाबदारी टाकली आहे. सध्या भाजपचा एक  नगरसेवक  व नाईकांबरोबर आलेले तीन नगरसेवक यांचा विचार करता भाजपचे संख्याबळ अधिक आहे, मात्र झोपडपट्टी विभागात किती मदत मिळते यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. या विभागात महाविकास आघाडी व भाजप यांच्यात तुल्यमबळ लढत होईल, अशी शक्यता आहे.

विभागाची रचना

दिघा विभागात एकूण सहा प्रभाग येतात. यात प्रभाग १ मध्ये ईश्वरनगर तर प्रभाग २ मध्ये रामनगरचा भाग येतो. दिघा एक हा भाग प्रभाग ३ मध्ये येतो तर दिघा दोन हा भाग प्रभाग चार मध्ये येतो. इलठण पाडा हा भाग प्रभाग पाच मध्ये येतो. दिघ्याचा शेवटचा प्रभाग हा ९ असून या प्रभागात दिघा तीनचा भाग येतो. यातील ईश्वरनगरचा काही भाग आणि संजयगांधी नगर (प्रभाग ९) चा काही भाग हा सिडकोच्या अखत्यारीत असून अन्य सर्व भाग हा औद्योगिक वसाहतीत येतात.

जमेची बाजू

दिघ्यात लवकरच रेल्वे स्थानक होणार आहे. या शिवाय मेट्रोचे नियोजन आहे. साठेनगर येथे १५ कोटी रुपयांच्या ५ एमएलटी पाणी क्षमतेच्या दोन टाक्या बांधण्यात येत आहेत. त्यामुळे पाणीप्रश्न सुटेल अशी आशा आहे. विभागात मलनिस्सारण वाहिन्या, रस्ते व पदपथाची कामे सुरू आहेत. ठाणे-बेलापूर रस्त्यावर पादचारी पुलाचा प्रस्ताव मंजूर असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. दिघा तलावात बोटिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.

विद्यमान नगरसेवक

  •  प्रभाग १ : उज्ज्वला झंजाड (भाजप)
  •  प्रभाग २ : शुभांगी गवते ( शिवसेना)
  •   प्रभाग ३ : दीपा गवते (भाजप)
  •  प्रभाग ४ : नवीन गवते (भाजप)
  •  प्रभाग ५ : जगदीश गवते (शिवसेना)
  • प्रभाग ९ /अपर्णा गवते (भाजप)

अनेक वर्षांपासून दिघ्यात राहतो. मात्र नागरी कामे कोणतीच झालेली नाहीत. किमान उद्यान आणि वाचनालय तरी उभारावे. या शिवाय सुसज्ज नागरी आरोग्य केंद्राची येथे गरज आहे.

-रोहिदास नेटके, दिघा

दिघा नवी मुंबईत असला तरी विकासाच्या बाबतीत दिघा आणि उर्वरित नवी मुंबईत खूप फरक आहे. त्यामुळे हा विभाग पालिकेकडे महसुली हस्तांतरित करावा आणि एमआयडीसीने त्यावरील हक्क सोडावा. यानंतर विकासाची गंगा या ठिकाणी येईल.

-सिद्धार्थ गाढे, दिघा

महिलांसाठी तर या विभागात काहीही चांगल्या सुविधा नाहीत. मुलांना खेळण्यासाठी ना मैदान आहे ना उद्यान. जे आहे त्याचीही अवस्था वाईट आहे. आमचे नातेवाईक आल्यानंतर आम्हालाच येथे राहतो, याचे वाईट वाटते.

-ज्योती कांबळे, दिघा