तिसऱ्या मुदतवाढीनंतरही प्रतिसाद नाही;प्रक्रिया रद्द करण्याची तयारी

नवी मुंबई : शासनाकडून लस उपलब्ध होत नसल्याने नवी मुंबई महापालिकेने लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढल्या असून प्रतिसादाअभावी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. एका लस पुरवठादाराने प्रतिसाद दिला आहे. मात्र त्याबाबतही साशंकता आहे. त्यामुळे लस खरेदी रखडणार असल्याचे दिसत आहे. पालिका प्रशासन प्रतिसाद न मिळाल्यास प्रक्रिया रद्द करण्याच्या विचारात आहे.

लसीकरण मोहीम संथ गतीने सुरू असून वारंवार खंड पडत आहे. आतापर्यंत महापालिका प्रशासनाने एक लाख नागरिकांना दोन्ही मात्रा दिल्या आहेत. मात्र मोठय़ा प्रमाणात लसीकरण करायचे असेल तर लस उपलब्ध होणे गरजेचे आहे.

यासाठी महापालिका प्रशासनाने लस खरेदी करण्याचा निर्णय घेत यासाठी जागतिक निविदा काढल्या आहेत. चार लाख लस कुप्या खरेदी करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. मात्र या प्रक्रियाला प्रतिसाद मिळत नाही. १६ मे रोजी ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. निविदा प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी २२ मेपर्यंतची मुदत होती, परंतु पालिकेकडे कंपन्यांकडून विचारणा करण्यात आली, परंतु निविदा भरली नाही. त्यामुळे पालिकेने तीन वेळा या प्रकियेला मुदतवाढ दिली आहे. लस खरेदीच्या तिसऱ्या मुदतवाढीलाही प्रतिसाद न मिळाल्यास या निविदा प्रक्रियेबाबतच विचार करण्यात येणार असल्याचे सूतोवाच पालिका प्रशासनाने केले आहे.

पालिका प्रशासनाने भारत बायोटिक, सीरम तसेच स्पुटनिक या कंपन्यांनी संपर्क केला असून खासगी रुग्णालयांना लस प्राप्त होत असून पालिकेच्या निविदेलाही प्रतिसाद मिळाला आहे. तसेच स्पुटनिक लसपुरवठय़ाबाबत मुख्य पुरवठादार डॉ. रेड्डीज कंपनी यांच्याकडूनही पालिकेला विचारणा करण्यात आली आहे.

या निविदाकारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. तसेच कागदपत्रांची योग्य पूर्तता न झाल्यास निविदेबाबत सर्वानुमते योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.

नवी मुंबई महापालिकेने ४ लाख लस खरेदीसाठी निविदा मागवलेल्या आहेत. लस कंपन्याकडून पालिकेकडे विचारणा करण्यात आली आहे. तसेच खरेदी दराबाबतही विचारणा होत आहे. काही निविदाही प्राप्त झाल्या असून लस खरेदी निविदेला तिसरी मुदतवाढ दिली आहे. त्याची मुदत संपल्यानंतर निविदाकारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर निविदेबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.

  -अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका