लोकसंख्येच्या तुलनेत दहा टक्के चाचण्या केल्याचा पालिका प्रशासनाचा दावा

नवी मुंबई</strong> : ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण-डोंबिवली  व नवी मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश नुकतेच दिले होते. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या नवी मुंबई शहरात आतापर्यंत दीड लाख करोना चाचण्या करण्यात आल्या असून लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचा दर हा महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत १० टक्के नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी चाचण्यांची संख्या १६४ इतकी होती ती आता ५५१ झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करून करोनाची साखळी तोडण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

नवी मुंबई शहरातील बेलापूर, वाशी, नेरूळ, कोपरखैरणे, ऐरोली या विभागात करोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात सापडत असून नेरूळ आघाडीवर आहे. पालिकेची स्वत:ची प्रयोगशाळा सुरू झाल्यापासून चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून ३५० ते ४०० करोना रुग्ण सापडत आहेत. मृतांची संख्याही ६५० पर्यंत पोहचली आहे. पालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयावर पालिकेची मोठी भिस्त आहे. केंद्राच्या नियमानुसार आरटीपीसीआर व प्रतिजन चाचण्यांचे प्रमाण संतुलित करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी चाचण्यांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

चाचण्यांची संख्या (रविवापर्यंत)

८५,९५३ प्रतिजन चाचण्या

५६,१४४ आरटीपीसीआर चाचण्या

१,४२,०९७  एकूण चाचण्या

वाढीव देयकासाठी स्वतंत्र कक्ष

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.