बाराशे कोटी रुपये खर्चाच्या शीव-पनवेल मार्गावरील वाहतुकीचा वेग संथच
नवी मुंबई : शीव-पनवेल मार्गावरील छोटे खड्डे बुजवण्यासाठी त्यावर डांबरीकरणाचा थर देण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी किमान एक आठवडा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही हे काम नेमके कधी सुरू होणार आणि कधी संपणार याविषयी प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. या रस्त्यावरून वेगाने जाण्याची संधी कधी मिळणार, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.
बाराशे कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या आणि टोलेजंग टोलवसुली करणाऱ्या शीव-पनवेल मार्गावरील मुलामा पहिल्याच पावसात वाहून गेला. त्यामुळे वाहतूककोंडीत तासन्तास अडकून पडलेल्या प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. काहींना अपघातांनाही सामोरे जावे लागले.
पाऊस उसंत घेत नसल्याने आणि भरपावसात रस्ते दुरुस्ती करण्याचे तंत्र अवगत नसल्याने पाऊस थांबण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.
भर पावसात केलेली डागडुजी काही वेळातच वाहून जात होती. अखेर पावसाने विश्रांती घेतली आणि या रस्त्याची डागडुजी सुरू झाली, मात्र सीबीडी सानपाडा, शिरवणे येथील मोठे खड्डे वगळता सर्वत्र अतिशय संथ गतीने काम सुरू होते. मोठे खड्डे बुजवण्यात आले असले, तरीही वाशीतून वेगाने निघालेल्या वाहनांना तुर्भे सर्कल परिसरात ब्रेक लागू लागला.
थांबा एकीकडे बस दुसरीकडे..
महामार्गावर खड्डे पडल्याने तुर्भे एमआयडीसीसमोरून जाणाऱ्या सेवा रस्त्यावरील वाहतुकीचा भार प्रचंड वाढला आहे. महामार्गावर खड्डे असल्याने जड वाहने अतिशय धिम्या गतीने जात आहेत. तर छोटी वाहने, बेस्ट, एनएमएमटीच्या बसगाडय़ा, खोपोली नगरपरिषदेच्या परिवहन सेवेच्या गाडय़ा बिनदिक्कत सेवा रस्त्याचा वापर करत आहेत. परिणामी तुर्भे एमआयडीसी शिरवणे आणि जुईनगर बस थांब्यावरील प्रवाशांची तारांबळ उडत आहे. बस नेहमीच्या मार्गाने आली तर बस थांब्यासमोर थांबते तर सेवा रस्त्यावरून आली तर बस थांब्याच्या मागील रस्त्यावर थांबते. त्यामुळे प्रवाशांना दोन्हीकडे लक्ष ठेवावे लागत आहे.
मोठे खड्डे बुजविण्यात आले आहेत, मात्र लहान खड्डे बुजवण्याचा प्रयत्न फसत आहे. त्यात टाकलेले साहित्य वाहून जाऊन त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडत आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसांत अशा सर्व ठिकाणी खास करून सर्वात जास्त खड्डे असलेला तुर्भे सर्कलवर एक थर टाकण्यात येणार आहे. त्यासाठी डांबर-खडीचे मिश्रण वापरण्यात येईल. ते कायमस्वरूपी राहील.
– के.टी. पाटील कार्यकारी अभियंता सायन पनवेल महामार्ग प्रकल्प