मजुरीसाठी जुन्या नोटा; पाचशे, हजारच्या सुटय़ांसाठी शंभर रुपयांची हानी

नेहमी रोजगाराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नाका कामगारांना सध्या मोठय़ा प्रमाणात काम मिळू लागले आहे. ४५० रुपये मजुरी मिळेल पण पाचशेच्या जुन्या नोटा घ्याव्या लागतील, असे सांगितल्याबरोबर मजूरही कामासाठी तयार होतात. या नोटा सुटय़ा करण्यासाठी त्यांना १०० रुपये दलालांना आणि ५० रुपये मजुरी देणाऱ्याला द्यावे लागत आहेत. त्यामुळे घामाच्या पैशांसाठी १०० रुपयांची घट सहन करावी लागत आहे. एरवी बेरोजगारीचा सामना करणारे मजूर मात्र शांतपणे ही पिळवणूक सहन करीत आहेत.

सकाळी सातवीपासून नाक्यावर महिला व पुरुष कामगार जमा होतात. यातील बहुतेक जण जेवणाचा डबा घेऊन नाक्यावर येतात. त्यानंतर घोळक्यांनी उभे राहून किंवा बसून काम मिळण्याची प्रतीक्षा करतात. ‘आमचे जेवण आम्ही आणले आहे, ४५० रुपये मजुरी घेऊ’, असे सांगतात. समोरचा मालक त्यांना काम देतो पण ‘पाचशेच्या रद्द नोटा घ्याव्या लागतील,’ असे सांगतो. त्यावर मजूर तातडीने तयार होतात.

रद्द नोटांमुळे सगळेच त्रस्त असताना मजुरांकडे रद्द झालेल्या नोटा कशा चालतात, असा प्रश्न पडतो. एका मजुराने नाव न सांगता याची माहिती दिली. ‘येथे अनेक  जण आहेत, जे आमच्याकडून रद्द झालेल्या पाचशेच्या नोटा घेतात. मात्र सुटे पैसे देताना शंभर रुपये कमी देतात. आम्हाला यामुळे सध्या दररोज काम मिळू लागले आहे. अनेक दिवस काम न मिळाल्याने आम्ही बेरोजगार होतो. आता काम करूनही १०० रुपये जातात पण घर चालविण्यासाठी सुटे पैसे तरी मिळतात, याचा आनंद आहे.’ असे शेकडो नाका कामगार उरणमध्ये आहेत. त्यांच्या जिवावर दलाली करून गब्बर होणाऱ्यांचे उखळ या नोटबंदीमुळे पांढरे होत आहे.

बँकांत दमदाटी

अनेक बँकांत महिलांनी तासन्तास रांगा लावून नोटा बदलून घेतल्या. वीस ते पंचवीस हजार रुपये भरणाऱ्या महिलांना ‘बाई, इतके पैसे आपल्याकडे कसे आले,’ असा प्रश्न विचारून तुमची चौकशी केली जाईल, असा दमही दिल्याची माहिती समिता पाटील या महिलेने दिली. महिलांच्या खात्यावर अडीच लाख रुपये भरण्याची घोषणा केली आहे.

व्यवसायावर परिणाम

मालाचा पुरवठा करण्याचा व्यवसाय अनेक जण करतात. यात सामान खरेदी करण्यासाठी रोख रकमांचाचा वापर केला जातो. त्यामुळे व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या रकमा बँकेत असतानाही नियम-अटींमुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याचे चंद्रकांत मढवी फळ-भाजी व्यापाऱ्याने सांगितले. व्यवसायासाठी उसनवारी करण्याची वेळ आली आहे. यात सुधारणा न झाल्यास व्यवसायावर परिणाम होईल, असेही ते म्हणाले.