‘भाजपकडून ईडीचा राजकीय वापर’

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पहाटे चार वाजता भेट देत भाजी, फळ व कांदा बाजारातील व्यापारी व खरेदीदारांशी संवाद साधला. पवार कुटुंबीयाने यानिमित्ताने माथाडी व व्यापाऱ्यांशी दुरावलेले संबंध कायम असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला असून पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण असल्याची चर्चा सुरू आहे.

दोन वेळा कॅबिनेट मंत्री, एक वेळ खासदारकी, तीन वेळ आमदारकी, वीस वर्षांत महापौरपद निवडीचे स्वतंत्र देऊनही पक्षाला अडचणीच्या काळात सोडचिठ्ठी देणाऱ्या आमदार गणेश नाईक यांना यंदाच्या पालिका निवडणुकीत कात्रजचा घाट दाखविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या सर्व कुटुंबाने कंबर कसली आहे. रोहित पवारांची ही भेट या राजकीय खेळीचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.

या भेटीत रोहित पवार यांनी भाजपकडून ईडीचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप करीत मलाही इडीची नोटीस येईल असे सांगितले. तर शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र शासनाने चर्चेतून मार्ग काढण्याऐवजी हुकूमशाही पद्धतीने शेतकऱ्यांशी वागत असल्याचा आरोप केला. नवी मुंबई महापालिका निवडणुका विकास आघाडी एकत्रित लढवेल अशी आशा व्यक्त करीत याबाबत निर्णय तिन्ही पक्षाचे वरिष्ठ घेतील असेही सांगितले.

विरोधात जाणाऱ्या सहकाऱ्यांना कात्रजचा घाट दाखविण्यात हातखंडा असलेल्या पवार यांनी ही पालिका निवडणूक जिंकण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार व माथाडी नेते शशिकांत शिंदे यांना दिले असून या मैदानात आता युवा मतदारांना आकर्षित करणारे राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्यावर   जबाबदारी सोपविली असल्याचे समजते. खासदार सुप्रिया सुळेदेखील महिलां मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मैदानात उतरणार असून कोविड प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी त्यांनी नवी मुंबईत प्रचाराला सुरुवात केली होती. आता पक्षाने जबाबदारी दिली तर आपण नवी मुबंई पालिका निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याचे मोघम उत्तर रोहित पवारांनी दिले आहे.

एपीएमसीतील भाजी बाजार कसा चालतो हे पाहण्यासाठी आपण इतक्या पहाटे आल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.