सीसीटीव्ही बसविण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष; पोलिसांची मागणी बेदखल

पनवेल : शहरातील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे हे महत्त्वाची भूमिका बजावत असून गेल्या सहा वर्षांपासून पनवेल शहरात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी पोलिसांकडून पालिका प्रशासनाकडे होत आहे. मात्र ही मागणी बेदखल केल्याने शहरातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या तपासकामातही अनेक अडथळे येत आहेत.

पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या सिडको वसाहतीत मात्र सिडकाने सीसीटीव्ही बसविल्याने अनेक गंभीर गुन्ह््यांची उकल करण्यात पोलिसांना शक्य झाले आहे. मात्र पूर्वीच्या नगरपालिका हद्दीत अद्याप सीसीटीव्ही न बसविल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. १७ जानेवारी रोजी खिडुकपाडा येथील पार्वती उलवेकर या महिलेने शहरातील कापड गल्लीतील ईश्वारी गोल्ड या दुकानातून दोनशे तोळे सोन्याचे दागिने खरेदी केले होते. ते घेऊन घरी जात असताना एका दुकानात एका महिला चोरट्याने हातचलाखीने त्यांच्याकडील सोन्याच्या दागिन्यांची पिशवी लंपास केली. या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात चोरीचे हे सर्व दृश्य कैद झाले. मात्र चोरटी महिला नंतर कोणत्या दिशेने फरार झाली याची माहिती मात्र पोलिसांना मिळू शकली नाही. जर शहरात इतर सार्वजिनिक ठिकाणी कॅमेरे असते तर त्या महिलेपर्यंत पोलिसांना पोहोचता आले असते. असे अडथळे पोलिसांना येत आहेत.

दुसरीकडे सिडको वसाहतींत सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. यात दोन वर्षांपूर्वी कळंबोली येथील सुधागड विद्यालयाशेजारी ठेवलेल्या बॉम्बचा महत्त्वाचा गुन्हा उघडकीस करण्यास नवी मुंबई पोलीस दलाला यश मिळाले. तर शीव-पनवेल महामार्गावरील कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरून झालेल्या   कोट्यवधी रुपये किमतीच्या सोन्याची चोरीही यामुळे उघडकीस आली होती. खारघरमधील दरोडा असोत किंवा कामोठ्यातील खून प्रकरण असे अनेक गुन्हे उकल झाले आहेत.

ही सर्व अडचण ओळखून शहराच्या सुरक्षेसाठी सहा वर्षांपासून नवी मुंबई पोलिसांकडून  शहरात २७ मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे असून तसा लेखी अहवाल तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांनी दिला आहे. यापूर्वीही अनेकांनी तशा पालिकेला सूचना केल्या होत्या. लोकप्रतिनिधींकडूनही तशी अनेकदा मागणी करण्यात आली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनीही नुकतीच आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पनवेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याविषयी पालिकेच्या सदस्यांना मार्गदर्शन केल्यास शहर अजून सुरक्षित होईल याकडे लक्ष वेधले आहे. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे मुख्य चौकात लागल्यास अथवा रस्त्यांवर कॅमेराची टेहळणी असल्यास वाहतूक कोंडीवरही वाहतूक पोलिसांना नियंत्रण ठेवता येईल, असे सुचविले आहे. मात्र पालिका प्रशासन याबाबत गंभीर दिसत नाही. याबाबत अद्याप कोणतेही पाऊल उचलले न गेल्याने शहरातील सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे.

तीन वर्षांपूर्वीच याबाबत सर्वसाधारण सभेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याविषयीच्या ठरावावर चर्चा करण्यात आली. तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांनी त्यावेळी अपुरे मनुष्यबळ आणि संगणकीय क्षेत्रातील अधिकारी कमी असल्याचे उत्तर सभागृहात दिले होते. पालिकेत सध्या इतर विकासकामांना प्राधान्य दिले आहे. सीसीटीव्ही कॅमेरेही गरजेचे आहेत. हाती घेतलेली कामे पूर्ण झाल्यावर प्राधान्य दिले जाईल. -परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल पालिका

पनवेल पालिका प्रशासनाने अद्याप शहरात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे नियोजन केलेली नाही. त्याची अधिक माहिती घेऊन त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. -तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पनवेल पालिका

 

पनवेल शहरात गणेशोत्सवात पोलीस दलाकडून सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्याची मागणी झाल्यानंतर जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विसर्जनस्थळांवर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पंधरा दिवसांसाठी सीसीटीव्ही कॅमेरे तात्पुरत्या स्वरूपात संस्थेने उभारले आहेत. त्यानंतर संस्थेने व मी स्वत: पालिकेकडे लेखी मागणी केली आहे. -प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल पालिका