देशात पहिल्या क्रमांकाचे शहराला वेध

 

नवी मुंबई : दोन ऑक्टोबरच्या महात्मा गांधी जयंतीपासून केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान पुन्हा राबविण्याचे आदेश जारी केल्याने नवी मुंबई पालिकेने आपले देशातील तिसरे व राज्यातील पहिले स्वच्छ शहराचा मिळालेला सन्मान कायम राखण्यासाठी शुक्रवारपासून कंबर कसली आहे. या अभियानाचा शुभारंभ पंधरा सफाई कामगारांच्या उपस्थितीत ऑनलाइन करण्यात येणार आहे.

 

पथनाट्य, घोषवाक्य आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्माण करण्यात येणार असून महात्मा गांधी यांचा लक्षवेधी असा चष्मा व चरखा पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ या टाकाऊ वस्तूपासून बनविण्यात येणार आहे.

 

केंद्र सरकाराने गेली सहा वर्षे सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानात नवी मुबंई पालिकेला स्वच्छ शहराचा पहिला क्रमांक हुलकावणी देत आहे.  ग्रामीण भागातील मल व जल वाहिन्यांच्या अपुऱ्या सुविधेमुळे मागे पडणाऱ्या या शहरात त्या मल वाहिन्या टाकण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. रहिवाशांच्या प्रतिसादाअभावी पिछाडीवर जाणारे हे शहर नंतरच्या काळात आघाडीवर आले आहे. त्यामुळे गत वर्षीच्या स्वच्छ भारत अभियानात देशातील हजारो शहरांच्या यादीत नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

 

आता या क्रमांकाच्या पुढे जाण्यासाठी करोनाकाळातही स्वच्छता कायम ठेवून काही वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासाठी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गुुरुवारी एक बैठक घेतल्याचे समजते. अभियान अधिक जोमाने राबविण्याचे मार्गदर्शन त्यांनी या बैठकीत केले. शुक्रवारी पालिका मुख्यालयात या अभियानाचा शुभारंभ सामाजिक अंतर राखून केवळ पंधरा साफसफाई कामगारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम केला जाणार असून सामाजिक अंतराचा नियम पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वच्छता हा या आजाराला दूर ठेवण्याचा एक उत्तम मार्ग असल्याने त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी ऑनलाइन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. गेल्या वर्षी तिसरा क्रमांक पटकविणाऱ्या पालिकेला आता पहिल्या क्रमांकाचे वेध लागले आहेत.

 

जनतेचा प्रतिसाद महत्त्वाचा देशात अव्वल येणाऱ्या  मध्य प्रदेशातील इंदूर पालिकेतील जनतेचा प्रतिसाद हा महत्त्वाचा मानला गेला आहे. करोनाकाळात जनतेने स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना समाजमाध्यमांचा वापर केला आहे. हाच फंडा नवी  मुंबईला पहिला क्रमांक मिळविण्यासाठी पालिका वापरणार आहे.

 

करोना साथीचे मोठे संकट शहरासमोर आहे. मात्र त्याचा सामना पालिका प्रशासन करीत आहे. केंद्र सरकारने स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश दिले असल्याने पालिकेने तयारी सुरू केली असून या उपक्रमाचा उद्या शुभारंभ होणार आहे.

 

डॉ. बाबासाहेब रांजळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन