नवी मुंबई पालिकेकडून लवकरच नोटीस

विकास महाडिक, लोकसत्ता

नवी मुंबई : एका दिवसात दोन विसंगत अहवाल दिल्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या ‘थायरोकेअर’ या खासगी प्रयोगशाळेला नवी मुंबई पालिका क्षेत्रात संशायितांचे ‘स्वॅब’ जमा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीही या प्रयोगशाळेच्या वतीने काही खासगी रुग्णालयातून ‘स्वॅब’ जमा केले जात असल्याचे पालिका आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रयोगशाळेला पालिका सुनावणी घेऊन कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे.

एप्रिलमध्ये शासकीय प्रयोगशाळांसह काही खासगी प्रयोगशाळांना संशयितांचे ‘स्वॅब’ जमा करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. यात ‘थायरोकेअर’ ही आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा मुंबई, ठाणे, कल्याण-डोबिंवली, नवी मुंबई आणि पनवेल शहरांमधील रुग्णांचे स्वॅब जमा करीत होती. या स्वॅब नमुना अहवालांच्या तक्रारींवरून पनवेल पालिकेने या प्रयोगशाळेला सर्वप्रथम ‘स्वॅब’ जमा करण्यास बंदी घातली. त्यानंतरही ठाणे आणि नवी मुंबई पालिकेलाही या अहवालातील विसंगती आढळून आल्याने त्यांनीही या प्रयोगशाळेला खासगी रुग्णालयातून ‘स्वॅब’ जमा करण्यास मनाई केली.

नवी मुंबई पालिकेने ‘थायरोकेअर’ला दोनदा नोटीस बजावली. सानपाडा ते वाशी या चार किलोमीटर परिसरात एका रुग्णाने घेतलेल्या दोन रुग्णालयांतील विसंगत अहवाल २४ तासांत वेगवेगळे आल्याने पालिकेने या प्रयोगशाळेची तुर्भे येथील मध्यवर्ती प्रयोगशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण, रुग्णांची वाढती संख्या आणि शासकीय प्रयोगशाळांचा हतबलता लक्षात घेता केवळ पालिका क्षेत्रात ‘स्वॅब’ जमा न करण्याचे आदेश या प्रयोगशाळेला देण्यात आले होते. या प्रयोगशाळेची मुख्य प्रयोगशाळा तुर्भे येथील एमआयडीसीत आहे.

पालिका सध्या चार शासकीय व दोन खासगी प्रयोगशाळांतर्गत ‘स्वॅब’ तपासणी अहवाल घेत आहे. याशिवाय ऐरोली आणि वाशी येथे पालिका स्वत:च्या प्रयोगशाळा उभारत आहे. त्यामुळे दुसऱ्या खासगी प्रयोगशाळेची आवश्यकता भासत नाही. असे असताना काही खासगी रुग्णालयातून ही प्रयोगशाळा रुग्णांचे स्वॅब नमुने जमा करीत असल्याच्या तक्रारी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत. ‘आयसीएमआर’ला देण्यात आलेल्या अहवालातही ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे पालिका या प्रयोगशाळेला पुन्हा कारणे दाखवा नोटीस देणार असल्याचे पालिकेच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले.

पत्त्यात बदल?

काही रुग्णांचे निवास हे नवी मुंबई आहे. पण, ते उपचार इतरत्र घेत असल्याने त्यांचे ‘स्वॅब’ अहवालातील पत्ता हा नवी मुंबईतील दिसून येत आहे. सर्वप्रथम या प्रयोगशाळेला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर नोटीसची कार्यवाही पूर्ण केली जाणार असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.