बंदीनंतरही काळाबाजार जोरात

पनवेल : टाळेबंदीत तंबाखूजन्य पदार्थ विक्री व उत्पादनावर बंदी असताना सर्रास काळाबाजार सुरू आहे. पनवेल परिसरात पाच रुपयांच्या तंबाखू पुडीसाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत. तंबाखूसह सिगारेट व गुटख्याच्या अवैध व्यवसायानेही जोर धरला आहे. मात्र तंबाखू व इतर सेवनाचे पदार्थ तालुक्याच्या परिसरात पोहोचतात कसे, याचे गूढ कायम आहे.

पनवेल शहराबरोबर तालुक्यातील तब्बल शंभर गावांमध्ये तंबाखूचा काळाबाजार सुरू आहे. पनवेलमधील काही इमारतींमध्ये टाळेबंदीच्या काळात तंबाखू, सिगारेट, गुटखा यांचे व्यसन असलेले वेगळे गट तयार झाले आहेत. प्रत्येक जण आपल्याला लागणाऱ्या पदार्थाची साठेबाजी करण्यात मग्न आहे. पाच रुपयांची तंबाखूची पुडी ६० रुपयांना, अन्य वेळी दहा रुपयांना मिळणारी एक सिगारेट टाळेबंदीच्या काळात २० रुपयांना आणि दहा रुपयांना मिळणारी एक गुटख्याची पुडी दुप्पट दराने वीस रुपयांना विक्री केली जात आहे. अजून टाळेबंदीचा काळ वाढविल्यास एक तंबाखूची पुढी शंभर रुपये गाठेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. शहरी भागात इमारतींच्या रखवालदारावर तंबाखू आणण्याची जबाबदारी अनेक रहिवाशांनी सोपविली आहे.

तर काहींनी सोसायटीतील रहिवाशांना टाळेबंदीत तंबाखू पुरवून त्यावर नफा कमविण्याचा धंदा योजला आहे.

बंदोबस्तात पोलीस गुंतले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेशीवर बंदोबस्तात पोलीस गुंतले आहेत. त्यात मजुरांना एकत्र करणे, त्यांचे अर्ज भरणे, त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी वैद्यकीय मदत मिळवून देणे, मजुरांचे जेवण, त्यांना एकत्र रेल्वे स्थानकापर्यंत नेणे अशात व्यस्त असल्याने तंबाखू वाहतुकीच्या कोणत्याही गाडय़ा वाहतुकीदरम्यान पोलिसांना मिळालेल्या नाहीत, असे एका पोलिसांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.