विकास महाडिक

नवी मुंबईवर बाराशे सीसीटीव्ही कॅमेरांची नजर

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आर्थिक असमर्थता दाखविल्याने आता नवी मुंबई पालिका शहराच्या कानाकोपऱ्यात १२०० सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहे. सिडकोने आपल्या दक्षिण नवी मुंबई क्षेत्रात सहाशे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची तयारी ठेवली आहे. त्यातील २९४ सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यात सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे लावणारी नवी मुंबई पालिका ही पहिली पालिका आहे. त्या वेळी लावण्यात आलेले २६८ सीसीटीव्ही कॅमेरा सध्या निष्काम ठरत असल्याने ते बदलण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत पालिकेने सहा वर्षांपूर्वी मोक्याच्या जागांवर २६८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेरांची पोलिसांना काही गुन्ह्य़ाची उकल करण्यात खूप मोठी मदत झालेली आहे. शहरात वाढलेल्या सोनसाखळी चोरांवर या कॅमेरामुळे जरब बसलेली आहे. सिडकोने स्मार्ट सिटीअंतर्गत तरतूद केलेल्या खर्चात बेलापूर रेल्वे स्थानकावर महामुंबई क्षेत्रातील सर्व शासकीय सीसीटीव्ही कॅमेरांचा एक नियंत्रण कक्ष तयार करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सहा पोलीस २४ तास डोळ्यात तेल टाकून शहरातील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी नवी मुंबई पालिका क्षेत्रातील २६८ आणि सिडकोच्या खारघर, कळंबोली, कामोठे या दक्षिण नवी मुंबई भागातील २९४ सीसीटीव्ही कॅमेरांच्या जोडणी या नियंत्रण कक्षाला जोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पामबीच अथवा शीव-पनवेल मार्गावर सुसाट वाहन चालवून वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांच्या घरपोच दंड चलन पाठविण्याची व्यवस्थादेखील या नियंत्रण कक्षामुळे वाहतूक पोलिसांना शक्य झाली आहे. मध्यंतरी या सीसीटीव्ही कॅमेरांच्या विद्युत बिलावरून वाद झाल्याने हे सीसीटीव्ही कॅमेरे काही दिवस बंद होते. अखेर शहरातील जनतेच्या सुरक्षेची काळजी असलेल्या पालिकेने ही विद्युत देयक अदा केल्याने हे कॅमेरे सुरू झाले होते. मात्र आता या कॅमेरांची कार्यक्षमता मुदत संपलेली आहे. त्यामुळे तेही बदलण्याची आवश्यकता आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय राज्य शासनाच्या मदतीने शहरात विविध ठिकाणी १२०० कॅमेरे बसविणार होते, पण राज्य शासनाकडून येणारी मदत गेली चार वर्षे मिळालेली नाही. त्याचप्रमाणे शहरातील आमदार, खासदार यांनीही सीसीटीव्ही कॅमेरांसाठी प्रस्ताव शासनाला सादर केलेले नाहीत. त्यामुळे राज्यात एक श्रीमंत पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई पालिकेने महामुंबई क्षेत्रात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशी मागणी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी केली आहे. नवी मुंबई सिडकोच्या पनवेल, उरण या दक्षिण नवी मुंबई भागात (हा भाग नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात येत असला तरी) लावण्यात असमर्थ आहे. महालेखापालांच्या आर्थिक छाननीत हा मुद्दा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ नवी मुंबई पालिकेच्या १०५ चौरस किलोमीटर क्षेत्रात पालिका १२०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या तयारीत आहे.

राज्यातील पहिली पालिका ठरणार

या सीसीटीव्ही कॅमेरांच्या जाळ्यामुळे नवी मुंबई पालिका क्षेत्रातील प्रत्येक क्षेत्र हे सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीखाली येणार आहे. अशा प्रकारे शहरातील कोपराकोपरा सीसीटीव्ही कॅमेरांची नजर ठेवणारी नवी मुंबई पालिका राज्यातील पहिली पालिका ठरणार आहे. दक्षिण नवी मुंबई क्षेत्रात सिडकोच्या वतीने सहाशे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची तरतूद यापूर्वीच करण्यात आलेली आहे. रस्ते, मेट्रो यांच्या कामामुळे या भागातील काही कॅमेरे नंतर लावण्यात येणार आहेत.

मुंबईवरील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर राज्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावणारी नवी मुंबई पालिका ही पहिली पालिका आहे. हे कॅमेरे मोक्याच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. शिल्लक कॅमेरे पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाअंतर्गत पोलीस आयुक्तालयाकडून लावले जाणार होते मात्र त्यांनी असमर्थता दाखवली आहे. राज्य शासनाकडून वेळीच आर्थिक मदत न मिळाल्यास नवी मुंंबई पालिका शहरात १२०० सीसीटीव्ही कॅमेरांचे जाळे विणण्यास तयार आहे. पोलिसांकडून या जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत.

डॉ. रामास्वामी एन. आयुक्त, नवी मुंबई पालिका