उमेदवारांची चिंता वाढली; ठाणे मतदार संघात ४८.५६ तर मावळमध्ये ५१.३५ टक्के मतदान

नवी मुंबई : मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा ठाणे व मावळ मतदारसंघांतील मतदानाचा टक्का घसरल्याने प्रमुख उमेदवार तणावात आहेत. सर्वसाधारणपणे कमी मतदान हे प्रस्थापित उमेदवाराच्या पथ्यावर पडणारे असल्याचे मानले गेले आहे, तर जास्त मतदान हे प्रस्थापितांच्या विरोधात नाराजी व्यक्त करणारे असते. दुपापर्यंत मतदानाचा असलेला उत्साह नंतर कडाक्याच्या उन्हामुळे ओसरल्याचे दिसून आले, तर मुस्लीमबहुल असलेल्या भागांत मतदारांनी हिरिरीने भाग घेतल्याचे दृश्य होते.

ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण मतदान ४८.५६ आणि मवाळ मतदारसंघात ५१.३५ टक्के मतदान झाले आहे. नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात ४८.९१ टक्के असून ऐरोली मतदारसंघात ४८.७९ ही टक्केवारी आहे. मागील निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघांत सरासरी ५६ टक्के मतदान झाले होते. ते आता सात ते आठ टक्क्यांनी घसरले आहे. याचा फायदा शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांना होणार हे दिसून येत आहे. मागील निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघांतून विचारे यांना ४२ हजार जास्त मताधिक्य मिळाले होते.

पनवेल विधानसभा मतदारसंघात ही टक्केवारी ४९.३७ टक्के मतदान झाले आहे, तर कर्जत विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले असून ही टक्केवारी ६१.२२ टक्के आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे; पण या ठिकाणी नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपचे प्राबल्य आढळून आले आहे. त्यामुळे या ठिकाणी झालेले जादा मतदान हे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे की काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या पथ्यावर पडणार याची गणिते जुळवली जात आहेत.

या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय वारसदार पार्थ पवार यांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात झालेले कमी मतदान हे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर शेकणारे आहे. उरण विधानसभा मतदार संघात ५९.६७ टक्के मतदान झाले आहे. हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा मानला गेला आहे. बारणे यांना मागील निवडणुकीत पाच लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. यात मावळ मतदारसंघातील घाटावरील तीन मतदारसंघ मावळ, चिंचवड आणि पिंपरी या तीन विधानसभा मतदारसंघांचा मोठा वाटा आहे. बारणे यांना पनवेल व उरण मतदारसंघांत मताधिक्य मिळण्याची आशा आहे; पण या वेळी पवार यांनी हे दोन्ही मतदारसंघ मतदारांना विकत घेण्याचे प्रयत्न करून पोखरलेले आहेत. त्याचा किती फायदा होतो ते २३ मे रोजी कळणार आहे. मात्र पवार यांच्यासाठी संपूर्ण बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या सहा विधानसभा मतदारसंघांत गेले दोन दिवस तळ ठोकून होते. त्या प्रत्येक कार्यकर्त्यांला दहा मतदार देण्यात आले होते. त्यांची राहण्याची व्यवस्था खंडाळा- लोणावळ्यातील सर्व हॉटेल्स व खासगी बंगल्यांत करण्यात आली होती. कर्जत मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदान जास्त आहे. मावळ मतदारसंघात शेकापच्या कार्यकत्यार्र्नी राष्ट्रवादीच्या पवारांसाठी मतदानाची टक्केवारी वाढेल कशी याकडे लक्ष दिले आहे. मावळ मतदारसंघात पैशाचा चांगला धूर काढण्यात आला होता.

मंगलमय स्वरात मतदारांचे स्वागत

वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय व सॅक्रेड हार्ट  शाळेमध्ये सनईचे मधुर सूर मतदान केंद्रात घुमत होते. सखी मतदान केंद्र म्हणून असलेल्या या मतदान केंद्रात महिला बचत गट आणि अधिकारी महिलांनी महिला मतदारांचे औक्षण करून स्वागत केले, ही संकल्पना यशस्वी ठरल्याचे माहिती साहाय्यक निवडणूक अधिकारी एस. आर. भालके यांनी दिली.

बहिष्काराचे अस्त्र म्यान

नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त लोकांचा विस्तारित गावठाण मालमत्ता सनद प्रश्न वर्षांनुवर्षे न सोडवल्याने आंदोलन उभे करणाऱ्या आगरी कोळी युथ फाऊंडेशनने मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामस्थांनी मतदान केल्याचे चित्र मतदान केंद्रांवर पाहावयास मिळाले. तर धमक्या देत मतदान करून घेऊनही ग्रामस्थांनी फारसा प्रतिसाद न दिल्याचा दावा आगरी कोळी युथ फाऊंडेशनने केला आहे.

उरणमध्ये मतदारांचा अल्प प्रतिसाद

मावळ लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या उरण तालुक्यात सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यापासूनच मतदारांचा अल्प प्रतिसाद दिसत होता. प्रामुख्याने इतर निवडणुकीत ज्या प्रकारे कार्यकर्ते उत्साहाने मतदारांना मतदानासाठी बाहेर काढतात तसे होताना दिसत नव्हते. १५ ते १६ टक्केच मतदान झाले होते.

पनवेलमध्ये मतदारांची तारांबळ

पनवेलमध्ये मतदान उत्साहात पार पडले. मात्र ईव्हीएम यंत्रात बिघाड व मतदार यादीत नावे नसल्याने मतदारांची तारांबळ उडाली.पनवेलमध्ये ५ लाख १० हजार २०६ मतदार आहेत. ५८४ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. सकाळी मतदान करणाऱ्यांची संख्या अधिक होती, मात्र दुपारी १२ ते ३ दरम्यान उन्हामुळे तुरळक मतदान झाले. संध्याकाळी पुन्हा मतदान वाढले.

पार्थसाठी तीनशे तर बारणेंसाठी दोनशे रुपयांचा प्रति मतास भाव

’ लोकसभा मावळ मतदारसंघासाठी सोमवारी मतदान झाले. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्याकडून प्रति मतास तीनशे रुपयांचा तर युतीचे उमेदवार श्रीरंग  बारणेंसाठी दोनशे रुपयांचा भाव फुटल्याची चर्चा होती.

’ २२ लाखांहून २७ हजार ७३३ अधिक मतदार मावळ मतदारसंघात असून त्यापैकी पाच लाख ३९ हजार मतदार पनवेलमध्ये आहेत. यामुळे आपल्याच बाजूने मतदारांनी कौल टाकावे यासाठी मतदारांपर्यंत ही अर्थपूर्ण पाकिटे पोहोचविण्यात आल्याचे बोलले जात आहे.