समुद्रानजीक बांधकामांत बेसुमार वाढ; जनजीवन विस्कळीत
नियम डावलून उरण परिसरात अनेक ठिकाणी समुद्राच्या जागांवर मातीचा भराव टाकून अतिक्रमण सुरू असून याचे परिणाम यावर्षीच्या पावसात दिसू लागले आहेत.त्यामुळे शनिवारी उरण तालुक्यात झालेल्या अवघ्या एक तासाच्या मुसळधार पाऊस व साथीला समुद्राची असलेली भरती एकत्र आल्याने उरण शहरासह तालुक्यातील अनेक गावे तासभरात तुंबली.तर मागील अनेक वर्षांत उरण शहरात रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पाण्याचा वेगही वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.तसेच उरणच्या किनाऱ्याचीही मोठी हानी झाली.
केंद्र सरकारने पर्यावरण राखण्यासाठी सीआरझेड तसेच अनेक कायदे काढले आहेत.असे असले तरी विकास आणि औद्योगिकीकरणाच्या नावाखाली समुद्र किनाऱ्यावरच नाही,तर चक्क समुद्रातच मातीचा भराव टाकून समुद्राची जागा बळकावून त्याच्यावर अतिक्रमण करणे सुरू आहे.त्यामुळे भरतीच्या वेळी समुद्रातील भरती ओहटीच्या कालावधीत ये जा करण्या पाण्याला ये जा करण्यासाठी असलेल्या नैसर्गिक वाटा बंद करण्यात आलेल्या आहेत.निसर्ग नियमानुसार समुद्राची जागा व्यापल्यास समद्राचे पाणी आपला मार्ग निवडते आणि त्यामुळे सध्या उरण परिसरातील गावांना भरतीच्या पाण्याचा धोका वाढू लागला आहे.यात सध्या पावसाची भर पडली असून समुद्र व खाडी किनारी पावसाचे पाणी व समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा सामना झाल्याने पाणी पातळीत वाढ होत असल्याचे मत पर्यावरण कार्यकर्ता सुरेश भोईर यांनी व्यक्त केले.तसेच यामध्ये सुधारणा न झाल्यास पाणी पातळीत वाढ होण्याचाही धोका असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे अवघ्या एक तासाच्या जोरदार पावसात उरण मध्ये पाणीच पाणी झाले होते.शनिवारी दुपारी ११ ते १ वाजताच्या दरम्यान झालेल्या पावसामुळे उरण शहरातील खिडकोळी नाका,गणपती चौक तसेच पेन्शनर्स पार्क येथे तीन ते चार फुट वेगाने पाणी वाहत होते.या वाहनाऱ्या पाण्याचा इतका वेग आपण आपल्या आयुष्यात कधीच पाहीला नसल्याचे मत उरण मधील रहीवाशी मनोहर ठाकूर यांनी व्यक्त केले.याच पावसात उरण करंजा रस्त्याला भगदाड पडले आहे.यावेळी कासवले गावातील घरांना पाणी शिरल्याने प्रशासनाला हस्तक्षेप करून येथील बांध तोडावा लागला.तर सध्या रस्त्याचे व गटारांचे काम सुरू आहे.ही कामे पूर्ण झाल्यानंतर यामध्ये सुधारणा होईल अशी माहीती उरण नगरपालीकेचे वरिष्ठ अभियंता अनुपकुमार कांबळे यांनी दिली.मात्र पहिल्याच पावसात ही स्थिती झाल्याने उरण मधील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.