दोन महिने दर मंगळवारी संध्याकाळी पाणी नाही; ‘मोरबे’ची पाणीपातळी ७ मीटरने कमी
नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र पावसाला उशीरा सुरूवात झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात १० टक्के पाणीकपातीचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दर मंगळवारी संध्याकाळी एकवेळ पाणीपुरवठा न करण्याचे ठरविण्यात आल्याचे पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सांगितले.
मोरबे धरणात गेल्या वर्षी जून महिन्यात ८८० मि.मी पावसाची नोंद झाली होती. तर शुक्रवापर्यंत फक्त १४७ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागामार्फत पाण्याचे नियोजन केले असून शहरात १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. धरण भरण्यासाठी अजूनही ३२०० मि.मी पावसाची आवश्यकता आहे. गेल्या वर्षीपेक्षा पाण्याची पातळी या वर्षी ७ मीटरने कमी आहे. त्यामुळे प्रशासनाने पुढील दोन महिने दर मंगळवारी संध्याकाळी पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाने आणखी हात आखडता घेतला तर पाणीकपात वाढविण्यात येईल, असे मोरबे प्रकल्प पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे यांनी सांगितले.
पनवेलमध्ये पाणी नाही
भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील वीजवाहिनी जळाल्याने शुक्रवारी पनवेल शहर, कळंबोली, करंजाडे व नवीन पनवेल या परिसरात पाणीपुरवठा बंद होता. शुक्रवार सकाळपर्यंत वीजवाहिनी बदलण्याचे काम होऊ न शकल्याने सिडको मंडळाने कळंबोली, नवीन पनवेल आणि करंजाडे या परिसरात भोंगा फिरवून घरातील शिल्लक पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले. घराबाहेर पावसाचे पाणी बरसत असले, तरी घरात मात्र पिण्यासाठी पाण्याची बोंब होती.
मोरबे धरणातील पाण्याची स्थिती
२८ जून २०१८ : ७७.४८ मीटर
२८ जून २०१९ : ७०.७८ मीटर
पाणीपातळीत वाढ
गुरुवारी मोरबे धरणाची पातळी ७०.७४ मीटर तर पाणीसाठा ५७.०७३ दक्षलक्ष घनमीटर होता. शुक्रवारी धरण परिसरात ८० मिलिमीटर पाऊस होऊन पाणीपातळीत किंचितशी वाढ झाली. ७०.७८ मीटर इतकी पाणीपातळी झाली असून पाणीसाठा ५७.२९३ दक्षलक्ष घनमीटर इतका झाला आहे. आतापर्यंत धरण परिसरात १४७.२० मिलिमीटर पाऊस झाला आहे.