नवी मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये झालेल्या वृक्षतोडीविरोधात गळा काढणाऱ्या शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळातच नवी मुंबईतील वाशी या मध्यवर्ती भागातील ३९० झाडे विकासाच्या जबडय़ात गिळंकृत होण्याची चिन्हे आहेत. पामबीच मार्गाशी संलग्न असलेल्या रस्त्यावर तीन किमी लांबीचा उड्डाणपूल उभारण्यासाठी महापालिकेने सहा झाडे मुळासकट कापण्याचे आणि ३८४ झाडे अन्यत्र स्थलांतरित करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, या झाडांचे पुनर्रोपण ही धूळफेक असल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी उड्डाणपुलास तीव्र विरोध केला आहे.

महापालिकेच्या प्रस्तावानुसार महात्मा फुले जंक्शन- अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपूल या मार्गावरील सहा वृक्ष तोडण्यात येणार असून, ३८४ वृक्षांचे स्थलांतर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या वृक्षतोडीची पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागालाच घाई झाली असून, सात दिवसांच्या आत त्याबाबत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन या विभागाने केले आहे. याबाबत फार गाजावाजा होऊ नये, यासाठी मोठय़ा वृत्तपत्रांत जाहिरात न देता रस्त्यावरील झाडांवरच नोटिसा चिकटवण्यात पालिकेने धन्यता मानली आहे.

अरेंजा कॉर्नर ते कोपरी हा वाशीतील महत्त्वाचा रहदारीचा रस्ता असून, त्या मार्गावर दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन मार्गिका आहेत. मात्र, त्यापैकी दोन्ही बाजूच्या एकेक मार्गिका बेकायदा वाहन पार्किंग आणि वाहनांचे सुटे भाग विकणाऱ्या दुकानांसमोर लागणाऱ्या वाहनांनी अडवून ठेवलेल्या असतात. परिणामी गर्दीच्या वेळी या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. ही वाहने हटवून रस्ता मोकळा करण्याऐवजी पालिकेने उड्डाणपूूल उभारण्याचे ठरविले आहे.

हे वृक्ष हटवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या प्रक्रियेबद्दलही संशय निर्माण होत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने यासंबंधी नागरिकांच्या हरकती, सूचना नोंदविण्यासंबंधी एक नोटीस नुकतीच प्रसिद्ध केली. त्यानुसार ३८४ वृक्षांचे नजीकच असलेल्या महापालिकेच्या सांडपाणी उदंचन केंद्राभोवतीच्या विस्तीर्ण भूखंडावर पुनर्रोपण केले जाणार आहे. सहा वृक्ष मुळापासून कापले जाणार आहेत. वृक्षांच्या पुनर्रोपणाच्या व्यवहार्यतेवर पर्यावरणप्रेमींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, या सर्व झाडांवर गदा येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आह़े

शहराच्या केंद्रभागी असलेली, जुनी आणि डेरेदार झाडे हटवण्याचा महापालिकेचा इरादा असताना त्याबाबत लपवाछपवी करण्यात आल्याचे दिसते. अधिकाधिक नागरिकांना याची माहिती मिळावी, यासाठी पालिकेने त्यासंबंधी व्यापक स्वरूपात जाहिरात प्रसिद्ध करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात एका स्थानिक वृत्तपत्रात ही जाहिरात देण्यात आली. तसेच तोंडदेखलेपणे झाडांवर नोटिसा चिकटवण्यात आल्या. या नोटिशीत सात दिवसांच्या आत हरकती नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, त्यावर अंतिम मुदत वा नोटिशीची तारीखही नमूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेबाबत संशय निर्माण होत आहे.

ठेकेदाराच्या भल्यासाठी?

आधी या उड्डाणपुलाच्या व्यवहार्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होत़े  मात्र, आता ३६३ कोटी रुपये खर्चून हा उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. प्रत्यक्षात मर्जीतील ठेकेदाराच्या झोळीत उड्डाणपुलाचे कंत्राट घालण्यासाठी या पुलाच्या उभारणीचा घाट घालण्यात आल्याचे समजते.

नेत्यांचा पुलासाठी आग्रह?

अरेंजा कॉर्नर ते कोपरी पुलाच्या उभारणीसाठीच्या हालचाली गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. सुरुवातीला वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्याच कारणास्तव हा पूल व्यवहार्य नसल्याचा अभिप्राय दिला होता. त्यानंतर महापालिकेने पूल उभारणीसाठी आवश्यक निधी नसल्याचे सांगत असमर्थता दर्शवली होती. मात्र, त्यानंतरही या पुलासाठी सिडकोकडून हट्टाने १५० कोटी रुपयांचे अनुदान घेऊन हा प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामागे प्रशासकीय राजवटीत ठाण्याहून नवी मुंबईचा कारभार हाकणाऱ्या काही नेत्यांचा आग्रह असल्याचे बोलले जात आहे.

रोगापेक्षा इलाज भयंकर

अरेंजा कॉर्नर ते कोपरी पुलापर्यंतच्या रस्त्यावर एका बाजूला वाहनांचे सुटे भाग विकणारी तसेच जुनी वाहने वाहने विकणाऱ्यांची दुकाने आहेत. या दुकानांतील वाहने या रस्त्यावरच उभी केलेली असतात. तसेच या ठिकाणी असलेल्या सतरा प्लाझा व्यापारी संकुलात येणारी वाहनेही रस्त्यावरच उभी करण्यात येतात. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. ही अनधिकृत वाहने हटवल्यास सर्व मार्गिका मोकळय़ा होऊन रस्ता रहदारीसाठी पूर्णपणे खुला होऊ शकतो. मात्र, ते करण्याऐवजी पालिकेने येथे उड्डाणपूल उभारण्याचे योजले आहे.

या प्रकल्पात २०० पेक्षा अधिक झाडे कापली जाणार असल्यामुळे यासंबंधीचा अंतिम प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविणे बंधनकारक असणार आहे. वृक्षांचे पुनर्रोपण योग्य पद्धतीने होईल याची विशेष दक्षता घेतली जाणार आहे.

जयदिप पवार, उपायुक्त, उद्यान विभाग

बेकायदा पार्किंगचा प्रश्न सोडविला तरी ज्या रस्त्यावरील वाहन कोंडी संपुष्टात येणे सहज शक्य आहे अशा मार्गावर ३६३ कोटी  खर्च करून आणि ३९० झाडांची कत्तल करून महापालिका कोणाचे हित साधू इच्छित आहे, हा प्रश्न सामान्य नवी मुंबईकरांना पडला आहे.

दिव्या गायकवाड, माजी अध्यक्ष, पर्यावरण समिती न.मु.म.पा.