पालिकेच्या जनजागृतीला यश; ७५ टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवकाळात जमा होणारे निर्माल्य पालिकेने ठेवलेल्या निर्माल्य कलशांत जमा करण्याचा आवाहनाला नवी मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सव काळात ६५ टन निर्माल्य गोळा झाले होते आणि त्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करण्यात आले होते. यंदा गौरी गणपती विसर्जनापर्यंत पालिकेने ४८ टन निर्माल्य गोळा केले आहे. यंदा निर्माल्यात गतवर्षीच्या तुलनेत १० टन वाढ होऊन ते ७५ टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पालिकेने निर्माल्य जमा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. २३ विसर्जन तलावावर सुका व ओला कचरा वेगळा जमा करण्यासाठी निर्माल्य कलश ठेवले आहेत. तसेच प्रत्येक तलावावर निर्माल्य वाहून नेण्यासाठी एका स्वतंत्र गाडीची व्यवस्था केली आहे. दीड, पाच, सात दिवसांच्या विसर्जनाच्या काळात पालिकेने सर्व तलावांवरील मिळून एकूण ४८ टन निर्माल्य गोळा केले आहे. २३ विशेष गाडय़ांच्या सहाय्याने हे निर्माल्य कचराभूमीवर नेले जाते. विसर्जन घाटावर केलेल्या चोख व्यवस्थेमुळे गणेशभक्त ओला व सुका कचरा त्यासाठी निश्चित केलेल्या स्वतंत्र निर्माल्य कलशातच टाकतात. यंदा दीड, पाच व सात दिवसांच्या गणपतींच्या संख्येत वाढ झाली आहे. सातव्या दिवशी सुमारे १० हजार मूर्तीचे विसर्जन झाले.

दोन वर्षांपूर्वी पालिकेने ओला व सुका कचरा वेगळा करण्याची योग्य सोय केली नसल्याने व नागरिकांमध्येही मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली नसल्याने सुरुवातीला गणेशभक्त गणरायाचे विसर्जन करताच निर्माल्य तलावात टाकत. त्यामुळे तलावात सर्वत्र निर्माल्य पडून राहात असे आणि तलावातील पाण्याला उग्र वास येत असे. परिणामी अस्वच्छ दिसत. परंतु यावर्षी पालिकेने निर्माल्यासाठी विसर्जन घाटावर केलेल्या चोख उपाययोजनेमुळे निर्माल्य व्यवस्थित वेगळे जमा केले जात आहे. तलावांवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे निर्माल्य वेगळे जमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विसर्जन झाल्यानंतर पालिकेचे सफाई कामगार दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत तलाव स्वच्छ करतात, अशी माहिती पालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. तर परिमंडळ-१ चे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनीही नागरिकांमध्ये मोठय़ा प्रमाणात जनजागृती होऊन पालिकेच्या प्रयत्नांना नागरिक सहकार्य करत असल्याचे सांगितले.

निर्माल्यासाठी विशेष व्यवस्था

  • प्रत्येक तलावावर निर्माल्य जमा करण्यासाठी स्वतंत्र २३ गाडय़ा,
  • प्रत्येक विसर्जन घाटावर ओला सुका कचरा वेगळा करण्यासाठी वेगळे निर्माल्य कलश.
  • कचरा टाकण्यासाठी हिरवे व निळ्या डब्यांची व्यवस्था गेल्या वर्षी विसर्जन तलावांवरून एकूण ६५ टन निर्माल्य जमा करून त्याचे कंपोस्ट खत तयार केले होते. यंदा सातव्या दिवसापर्यंतच ४८ टन निर्माल्य जमा करण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवसापर्यंत निर्माल्य संकलनात गतवर्षीच्या तुलनेत १० टनांनी वाढ होईल आणि यंदा सुमारे ७५ टन निर्माल्य गोळा होईल, असे दिसते. तुर्भे येथील डंपिंग ग्राऊंडवर निर्माल्याचे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी विशिष्ट व्यवस्था करण्यात आली आहे.

तुषार पवार, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन

नवी मुंबई महापालिकेच्यावतीने स्वच्छ भारत मिशन अभियान राबविले जात आहे. नागरिकांनाही विसर्जन तलावांवर जाऊन ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत मी मार्गदर्शन केले आहे. पालिकेच्या प्रयत्नांना गणेशभक्त चांगला प्रतिसाद देत आहेत. आपले शहर अधिक पर्यावरणशील व स्वच्छ राहील याबाबत पालिकेला सहकार्य करावे. अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी व पालिकेच्या स्वच्छ भारत मिशनच्या ब्रॅंड अ‍ॅम्बेसॅडर

 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 48 tons flower waste collected at navi mumbai
First published on: 02-09-2017 at 02:48 IST