प्रशासनाकडून दुर्लक्ष; संरचना तपासणी रखडली

पनवेल : दोन वर्षांपूर्वी पालीदेवद ग्रामपंचायतीने युगांतर कॉलनी परिसरातील (सुकापूर) ५० इमारतींना धोकादायक असल्याने नोटीस बजावली होती. अद्याप त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही.  त्यामुळे येथील रहिवाशांवर इमारत दुर्घटनेची टांगती तलवार कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या इमारतींना रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने इमारत बांधण्याची परवानगी दिली आणि सध्या हा परिसर सिडकोच्या नैना क्षेत्रात समावेश झाल्याने ग्रामपंचायतीने सिडकोकडे  संरचना तपासणी करण्याची विनंती केली आहे. मात्र सिडकोने अशी कोणतीही व्यवस्था आमच्याकडे नसल्याचे उत्तर देत दोन वर्षांपूर्वीच हात वर केले आहेत.

एखाद्या दुर्घटनेत जीवितहानी झाल्यानंतरच सरकारी प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न येथील ५० इमारतींमधील सदनिकाधारक विचारत आहेत. २५ वर्षांपूर्वी खासगी विकासकांनी या इमारतीचे बांधकाम केले होते. स्वस्तात सदनिका खरेदी करून अनेकांनी येथे घराचे स्वप्न पूर्ण केले. मात्र कालांतराने येथील इमारती वेळेपूर्वी जीर्ण झाल्या. या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या जिवाला धोका असल्याने पालीदेवद ग्रामपंचायतीने तातडीने संरचना तपासणी करून घेण्याचे सचिविले होते. मात्र रहिवाशांना प्रति इमारत २० हजार रुपयांचा खर्च परवडणारा नसल्याने या इमारतींचे परीक्षण रखडले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने रहिवाशांच्या या व्यथेबद्दल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांकडे विनंती केली. तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या प्रतिउत्तरात खासगी इमारत असल्याने अशी कोणतीही व्यवस्था सिडकोकडे नसल्याचे सांगत नोंदणीकृत लेखा परीक्षकांकडून संबंधित तपासणी करून घेण्याचे ग्रामपंचायतीला सुचविले. यानंतर गेल्या दोन वर्षांत शिवसागर या इमारतीचे बांधकाम अजून जीर्ण झाल्याने व इमारत एका बाजूने खचल्याने रहिवाशांनी इमारत रिकामी करून सुरक्षित ठिकाणी जाणे पसंद केले. अजूनही येथील ५० इमारतींची तपासणी रखडल्याने येथील अनेक नागरिक धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत. काही नागरिकांनी स्वखर्चातून इमारतीची डागडुजी करून येथेच राहणे पसंत केले आहे. मात्र या इमारतींना बांधकाम व भोगवटा परवानगी देणाऱ्या रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने कोणतीही जबाबदारी घेतली नाही. ग्रामपंचायतीकडे स्वत:ची यंत्रणा नसल्याने सिडकोला विनंती केली आहे.

पालीदेवद ग्रामपंचायत दोन वर्षांपासून संबंधित इमारतींची संरचना तपासणी करण्यासाठी सिडकोकडे प्रयत्न करीत आहे. या इमारती काही रहिवाशांनी रिकाम्या केल्या आहेत. मात्र अनेकांना इतर ठिकाणी राहणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नसल्याने ते येथेच राहत आहेत. लवकरच या इमारतींची संरचना तपासणी झाल्यास नेमकी कोणत्या बाजूने बांधकामाला धोका आहे, याचा शोध लागून त्याची डागडुजी करणे रहिवाशांना शक्य होईल.

– नंदकिशोर भगत, ग्रामसेवक, पालीदेवद ग्रामपंचायत

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50 buildings in danger navi mumbai ssh
First published on: 05-08-2021 at 00:44 IST