नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन २०२५- २६ या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ५०१ इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, शहरातील पुनर्विकासामुळे धोकादायक इमारतींच्या संख्येत यंदा मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. मागील वर्षी पालिकेने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतींची संख्या ५२७ होती.

धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे अशा ‘सी-१’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या ५१ इमारती तसेच इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-२ ए’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या १०३ इमारती आणि इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-२ बी’ प्रवर्गामध्ये मोडणा-या २९७ इमारती तसेच इमारतीची किरकोळ दुरूस्ती या ‘सी-३’ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या ४९ इमारती, अशा प्रकारे एकूण ५०१ धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आलेली आहे.

‘सी-१’ प्रवर्गातील इमारतीची विदयुत व जलजोडणी खंडित करण्यात येईल असे नोटिशीत स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. अशा धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतींचे मालक अथवा भोगवटादार यांनी ते रहात असलेल्या इमारतीचा वापर करणे धोकादायक असल्याने इमारत कोसळून जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या इमारतीचा वापर त्वरित बंद करावा आणि इमारत विनाविलंब तोडून टाकावी असे सूचित करण्यात आलेले आहे. अशा प्रकारची कार्यवाही न केल्यास, इमारत कोसळल्यास होणाऱ्या नुकसानीस फक्त संबंधित जबाबदार असतील, नवी मुंबई महानगरपालिका यास जबाबदार राहणार नाही असेही पालिकेने नोटिशीत स्पष्ट केले आहे.

या नोटिसीमध्ये धोकादायक इमारतींच्या नावासमोर रहिवास वापर सुरू आहे अथवा नाही याचीही नोंद करण्यात आलेली आहे. इमारतीच्या वर्गीकरणानुसार इमारतींचा भोगवटा वापर रहिवास करणाऱ्या नागरिकांनी इमारत तात्काळ निष्कासित करावयाची आहे किंवा वर्गीकरणानुसार नमूद केल्याप्रमाणे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या भोगवटाधारकांनी इमारत दुरुस्त करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. याबाबत कोणत्याही प्रकारे धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास त्यास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पावसाळा कालावधीत धोकादायक झालेल्या इमारतींचा, घरांचा वापर करणे धोक्याचे आहे. त्यामुळे जिवीत व वित्तहानी होऊ शकते. म्हणून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा, घरांचा रहिवास वापर तात्काळ थांबविण्यात यावा. – डॉ. कैलास गायकवाड, उपायुक्त, अतिक्रमण विभाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यादी कुठे उपलब्ध?

धोकादायक इमारतींची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर ‘विभाग’ सेक्शनमध्ये ‘अतिक्रमण विभाग’ माहितीच्या सेक्शनमध्ये ‘सामान्य माहिती’ या अंतर्गत अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या यादीमध्ये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करण्याच्या ‘सी–१’ प्रवर्गामध्ये नमूद ५१ इमारतींची नावे व तपशील नागरिकांना सहज कळावा यादृष्टीने ठळक अक्षरात प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.