पनवेल – तळोजा परिसरात घडलेल्या एका अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण नवी मुंबई हादरली आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्धाने भारतात आल्यावर केवळ १० वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या अत्याचार प्रकरणात त्या मुलीची स्वतःची आईही सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे पोलिस अधिकारीदेखील या घटनेने स्तब्ध झाले आहेत.तळोजा पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता.३०) दाखल गुन्ह्यानुसार, फारूक अल्लाउद्दीन शेख (वय ७०, मुळ रहिवासी लंडन) हा तळोजा सेक्टर २० मधील एका इमारतीत राहत होता.

त्याने १० वर्षांच्या बालिकेला मद्य पाजून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. हे अत्याचार मागील दोन वर्षांपासून सुरू असल्याचे उघड झाले आहे. अत्याचार उघड झाल्यास मारून टाकण्याची धमकी देऊन आरोपीने पीडितेला गप्प ठेवले होते.या प्रकरणी तळोजा पोलिसांकडे हे प्रकरण आल्यावर तातडीने बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाईला सुरूवात केली. पोलिसांनी पिडीतेच्या आईकडे याविषय़ी चौकशी केल्यावर धक्कादायक बाब उजेडात आली.

पिडीतेवर अत्याचार होत असल्याचे माहित असूनही या पिडीतेच्या आईने फारूक शेख याच्याकडे घर भाड्याने घेण्यासाठी अडीच लाख रुपये घेतल्याचे समोर आले. तसेच दर महिन्याचे रेशन फारूककडून मिळत असलेल्या रकमेतून तीची आई खरेदी करत असल्याचेही पोलिसांना समजले. फारूक हा बालिकेवर अत्याचार करत असल्याचे माहिती असूनही पिडीतेला राहण्यासाठी फारूकच्या घरी वारंवार पाठवित असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. अखेर फारूक व पिडीतेच्या आईला तळोजा पोलिसांनी अटक केली आहे.