१ कोटी ७३ लाख रुपये किमतीच्या ३९ गाडय़ा जप्त
मालकीचे वाहन भाडय़ाने लावतो, असे सांगून संबंधित वाहनाची बनावट कागदपत्रे बनवून त्या वाहनाची परस्पर विक्री करणाऱ्या चौकडीला कामोठे पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एक कोटी ७३ लाख रुपये किमतीची ३९ वाहने जप्त केली आहेत.
घणसोली येथे राहणारे विजेंद्र चंदेलिया यांनी काही महिन्यांपूर्वी घेतलेली नवी इनोव्हा कार दुकानासमोर उभी केली होती. १५ जुलै रोजी याच मार्गाने भिवंडी येथील विनोद शिरसाठ हे जात होते. तेव्हा त्यांना त्यांच्या मालकीची बेपत्ता इनोव्हा कार दिसली. इनोव्हा कारचा नंबर पाहून शिरसाठ यांनी मित्रांना बोलावून शोध घेतल्यावर त्यांच्या हाती अजब माहिती लागली.
चंदेलिया यांनी कारचे मालक असल्याचा दावा करत खरेदी करताना स्वत:च्या नावावर असलेली प्रादेशिक परिवहन विभागाची (आरटीओ) कागदपत्रे शिरसाठ यांना दाखविली. तोपर्यंत शिरसाठ यांनीही घरून इनोव्हा कारची त्यांच्या नावावर असलेली कागदपत्रे मागवून घेतली होती. हा वाद जवळच्या पोलीस ठाण्यात गेल्यावर तेथील पोलिसांनी हे प्रकरण कामोठे पोलीस ठाण्यात पाठवून दिले.
कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक व पोलीस उपनिरीक्षक एस. आर. पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केल्यावर संबंधित प्रकरणात शिरसाठ व चंदेलिया यांच्यासारख्या एक-दोन नव्हे, तर या ८० जणांची फसवणूक केल्याची बाब समोर आली. चंदेलिया यांनी संबंधित इनोव्हा कार विकी गायकवाड याच्याकडून अडीच लाख रुपयांना विकत घेतली होती.
विकी याला कामोठे पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर पोलिसांना वाहनांची बनावट कागदपत्रे बनवून विक्री करणाऱ्या मोठय़ा टोळीचा माग काढण्यात आला. या दलालाने मुंबई, ठाणे आणि पनवेल आरटीओचे बनावट शिक्के बनवून त्यातून ही फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
अजूनही पोलीस या प्रकरणातील अनेक आरोपींचा शोध घेत असून अशाप्रकारे फसवणूक झाली असल्यास वाहनमालकांनी कामोठे पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

हद्दीचा वाद
कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारात सध्या ९ इनोव्हा, ४ स्वीफ्ट डिजायर, ५ झायलो, १ शेवरले, ३ इर्टिगा, १ आर्या, १ सफारी, इंडिका, ५ स्कॉर्पिओ, १ शेवरले इंजॉय, १ रेनॉल्ट, १ डस्टर, १ टाटा इंडिगो व इतर गाडय़ांचा खच पडला आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण सुरुवातीला कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गेले होते. तेथील पोलिसांनी हद्दीचा वाद सांगत चंदेलिया यांना व्यवहार झालेल्या ठिकाणी कामोठेत पाठविण्यात आले.