पनवेल : मैत्री, विश्वास आणि आर्थिक व्यवहार यातील बेपर्वाईमुळे अखेर एका मित्राला पोलिस ठाण्यापर्यंत जाऊन तक्रार द्यावी लागली तर दूसरा मित्र गुन्हेगार ठरला. या घटनेमुळे परिसरात मैत्री करावी पण मैत्रित व्यवहार करू नये अशी चर्चा सुरू झाली. 

पनवेल तालुक्यातील आकुर्ली गावात राहणारा अर्जुन बळे आणि वाजेगावातील कुणाल भगत हे गेली दहा वर्षांचे जिवलग मित्र होते. मात्र आर्थिक व्यवहारातील बेपर्वाईमुळे या मैत्रीचे रूपांतर कटुतेत झाले आणि बुधवारी या मैत्रिचा अखेर होऊन पनवेल तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होण्यापर्यंत हे प्रकरण गेले.२०१८ मध्ये अर्जुन बळे याने रिक्षा खरेदीसाठी पारिजात बॅंकेतून कर्ज घेतले होते. त्यावेळी कुणाल भगत हा जामिनदार म्हणून उभा राहिला होता.

मात्र अर्जुनने वेळेवर हफ्ते न फेडल्याने कर्जाची थकबाकी तब्बल ३६ हजार रुपयांवर गेली. वसुली प्रक्रियेदरम्यान अर्जुनकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर बॅंकेने रिक्षा जप्त करून जामिनदार असलेल्या कुणालचे बॅंकखाते गोठवले.ही बाब ९ ऑगस्ट रोजी बॅंकेत गेल्यावर कळताच कुणाल संतापला. त्याने अर्जुनला वाजेगाव येथील घरी नेले. तेथे त्याचे हातपाय खुर्चीला दोरीने बांधून तोंडात कापडी गोळा कोंबून मारहाण केली.

एवढ्यावरच न थांबता, इंजेक्शन देऊन गुंगी आणून किडनी काढून विकण्याची धमकीही दिली. याच वेळी अर्जुनच्या खिशातील १२,३०० रुपये जबरदस्तीने घेतले.अर्जुनने या प्रकाराची तक्रार सुरुवातीला खांदेश्वर पोलीस ठाण्यात केली. नंतर ही तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर बुधवारी (ता. २६) पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कुणाल भगत याच्याविरोधात गुन्हा नोंदवला.