५३७ कोटी रुपयांची करवसुली; मार्चअखेर ७०० कोटी वसुलीचे लक्ष्य
संतोष जाधव
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ता करधारकांना दंडात्मक रकमेवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट देणारी अभय योजना १ डिसेंबरपासून ४ महिन्यांसाठी राबविण्यात आली होती. अभय योजनेअंतर्गत आजवर १९१ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तर अभय योजनेसह फेब्रुवारीपर्यंत ५३७ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल झाला आहे. आर्थिक मंदीतही नवी मुंबई पालिकेला अभय योजनेच्या माध्यमातून मोठी साथ लाभली आहे. आर्थिक वर्षांतील शेवटच्या महिन्यात ७०० कोटी रुपयांपर्यंत वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
पालिका स्थापनेच्या वेळी मालमत्ताचे सर्वेक्षण करून त्यावर कर निश्चित करण्यात आला होता, परंतु एकाच मालमत्तेवर दुबार देयके आल्याने थकीत मालमत्तेचा फुगवटा दोन हजार १०० कोटीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे देयकांची छाननी करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे.
शहरात सुमारे तीन लाख १५ हजार मालमत्ताकर धारक आहेत. फेब्रुवारी महिन्यापर्यंत पालिकेने ५३९ कोटी रुपयांची वसुली केली आहे. त्यात अभय योजनेअंतर्गत १९१ कोटींची वसुली झाली आहे.
थकीत मालमत्ता करांमध्ये सिडको तसेच शासकीय आस्थापनांकडून येणारी थकबाकीही मोठी आहे. पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य आर्थिक स्रोत मालमत्ता कर आहे.
मालमत्ता कराची वर्षनिहाय वसुली
२०१६-१७ ६४४ कोटी.
२०१७-१८ ५३५ कोटी
२०१८-१९ ४९१ कोटी
२०१९-२० ५३७ कोटी रु.
(फेब्रु.पर्यंत)
शेजारील महापालिकांच्या तुलनेत आणि आर्थिक मंदीच्या स्थितीतही पालिकेकडून फेब्रुवारीपर्यंत ५३७ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष अखेरीस ७०० कोटी करवसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
– अमोल यादव, उपायुक्त मालमत्ता विभाग