पालिकेकडून कामांना वेग, एमआयडीसीचे दुर्लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका व एमआयडीसी प्रशासन यांच्या वादात गेली अनेक वर्षे ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टय़ातील रस्त्यांची वाट लागली आहे. यावर तोडगा काढत पालिका व एमआयडीसीकडे रस्ते कामांचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेने महापेतील रस्त्यांच्या कामांना वेग दिला आहे. मात्र ‘ए ब्लॉक’मधील रस्त्यांकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष झाले आहे. कामे होत नसल्याने  खड्डे व प्रचंड धुळीतून येथील घटकांना प्रवास करावा लागत आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

येथील अंतर्गत रस्त्याची  रचना (डिझाईन) अद्याप तयार नसल्याचे समोर आले आहे. सध्या डागडुजीवरच काम भागवले जात आहे.   एमआयडीसीमध्ये एकूण १३६ किलोमीटरचे रस्ते असून त्यापैकी २१ किलोमीटर रस्ते एमआयडीसी बांधणार आहेत. मात्र एमआयडीसीचे काम अत्यंत धीम्यागतीने सुरू आहे. २१ पैकी सुमारे १५ किलोमीटरचे रस्ते ‘ए ब्लॉक’मध्ये आहेत. येथील रस्तेच शिल्लक राहिलेले नसून त्या पायवाटा झाल्या आहेत. प्रचंड खड्डे व धूळ असे येथील चित्र आहे. पावसाळय़ात तर अवजड वाहनचालक या भागात येण्यास उत्सुक नसतात, अशी माहिती येथील एका कारखान्यातील अशोक लोढा या अधिकाऱ्याने दिली.  रस्त्यांसाठी १७८ कोटी अपेक्षित असून आराखडा मान्यता मिळताच काम तात्काळ सुरू करण्यात येईल,  असे  एमआयडीसी कार्यकारी अभियंता आर.जी राठोड यांनी सांगितले.

ठाणे-बेलापूर रस्त्यावर ताण

ए ब्लॉकमधील अंतर्गत रस्ते खराब असल्याने  दिघा. रबाळेतून थेट महापेत असा प्रवास करायचा असेल तर ही सर्व वाहने थेट ठाणे बेलापूर महामार्गावर येतात. त्यामुळे महामार्गावरील रहदारी वाढते.  रस्ता खराब असल्याने हे करावे लागते अशी माहिती विक्रम माने या रिक्षाचालकाने दिली. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accelerate work municipality midc ysh
First published on: 15-01-2022 at 00:26 IST