नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या वाशी खाडी पुलावरील वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी बहुचर्चित असलेल्या तिसऱ्या वाशी खाडीपुलाचे काम वेगात सुरु आहे. परंतू या तिसऱ्या खाडीपुलाच्यासाठी जुन्या मार्गावर असलेल्या टोल नाक्यावरील दोन्ही बाजूची प्रत्येकी एक लेन कमी करण्यात आली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाताना टोलनाक्याच्या पुढे वाशी उड्डाणपुलावरून जाताना जपूनच गाडी चालवा. याच उड्डाणपुलावर पावसाने पडलेले खड्डे व ते बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला डांबरचा वापर यामुळे या पुलावर उन्हामुळे डांबर व खडी मिश्रित वेडेवाकडे खड्डे यामुळे हया उड्डाणपुलावरून गाडी चालवणे धोक्याचे बनले आहे.

हेही वाचा- विद्यार्थीनीचा मोबाईल लंपास, सिंघम पोलिसांनी पाच मिनीटांत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

रस्त्यावरील उंचवट्यामुळे अनेक दुचाकीस्वार येथे गाडीवरून कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे अन्यथा अनेकांना आपले प्राण गमावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे वाशी टोलनाक्यावर वाहनाचा अतिरिक्त बोजा असल्याने वाशी टोलनाक्यावर सातत्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. सातत्याने होणारी वाशी खाडी पुलावरील वाहनांची गर्दी यासाठी येथे तिसऱ्या पुलाची निर्मिती करण्यात येत असून या पुलाच्या निर्मितीसाठी एल अँन्ड टी कंपनीकडून कामाला गती देण्यात आली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वाशी खाडी पुलावरील पहिला पुल मुंबईकडून नवी मुंबईकडे येणाऱ्या फक्त हलक्या वाहनांच्या वाहतूकीसाठी वापरला जात होता तर दुसरा खाडीपुल सध्या वाहतूकीसाठी वापरण्यात येत आहे. दुसऱ्या खाडीपुलावर मुंबईकडे जाण्यासाठी ३ तर मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी ३ लेन आहेत.परंतू सातत्याने वाढणारी वाहनांची संख्या यामुळे नेहमी दुसऱ्या वाशी खाडीपुलावर वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे वाशी खाडीपुलावर तिसरा पुल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या तिसऱ्या पुलाच्या कामासाठी सध्या वेगवान काम सुरू असून खाडी पुलावरील वाहतूककोंडी त्यानंतर टोलनाका त्यामुळे यातून सुटका होताच पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहने वेगात जातात.परंतु वाशी उड्डाणपुलावर रत्यावर निर्माण झालेले डांबर व अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत.त्यामुळे या उड्डाणपुलावरून खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करून वाशी उड्डाणपुलावर पूर्ण डांबरीकरण करणे गरजेचे आहे.

हेही वाचा- उरणच्या वायू विद्युत केंद्र स्फोटातील आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन

पावसाळ्यात या उड्डाणपुलावर पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर खड्डे पडले होते.परंतु या खड्ड्यांची दुरुस्ती करताना अत्यंत निकृष्ट दर्जाचे खड्डे दुरुस्तीचे काम करण्यात आले होते.त्यामुळे काही दिवसातच येथे खड्डे पडले असून डांबर व खडीचे उंचवटे निर्माण झाले आहे. तिसऱ्या खाडीपुलाच्या कामामुळे पुणे व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकांवर टोलनाक्यावर पहाटेपासूनच गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे वाहनचालकांना सातत्याने वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.त्यातच वाशी पुलावरही धोकादायक उंचवटे निर्माण झाल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे .याबाबत सार्वजनिक
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील ठाकरे यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही.

अपघात झाल्यावरच सार्वजनिक विभागाला जग येणार का!

वाशी टोलनाक्यावर अगदी सकाळपासूनच वाहतूक कोंडी पाहायला मिळते. टोलनाक्यावर सततच्या वाहतूककोंडीचा फटका आम्हा वाहनचालकांना बसतो.त्यातच पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाशी उड्डाणपुलावर मोठे खड्डे व डांबराचे उंचवटे तयार झालेले आहेत त्यामुळे अनेक वाहन चालक व विशेषतः दुचाकी चालक यांना धोका निर्माण झाला असून अनेक वाहन चालक येथे गाडी घसरून पडत आहेत त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे नाहीतर याच अधिकाऱ्यांना येथून दुचाकीवरून प्रवास करायला लावला पाहिजे, असे मत वाहनचालक संदीप कामटे यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा- अवकाळी पावसामुळे कांदा खराब; परिणामी एपीएमसीत कांद्याच्या भावात वाढ

टोलनाका बनलाय वाहतूक कोंडी नाका

अगदी पहाटेपासूनच मुंबईच्या जाणाऱ्या मार्गावर वाशी गावापासून टोलनाक्यापर्यंत तर मुंबईहून पुण्याकडे जाताना पहाटे दुसऱ्या खाडीपुलावर वाहनांच्या रांगाच लागलेल्या असतात. त्यामुळे वाशी टोलनाका वाहतूककोंडीचा नाका झाला असल्याचा संताप वाहनचालक व्यक्त करत आहे.