scorecardresearch

सीवूड्स येथील न्युरोजन हॉस्पिटलवर नवी मुंबई महापालिकेची कारवाई; ऑटिझम मुलांसाठी बेकायदेशीरपणे स्टेम सेल थेरपीचा वापर

नवी मुंबई महापालिकेने कारवाई करत न्युरोजन हॉस्पिटलचा परवाना रद्द केला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला दिली.

Action on Neurogen Hospital
सीवूड्स येथील न्युरोजन हॉस्पिटलवर नवी मुंबई महापालिकेची कारवाई (प्रातिनिधिक छायाचित्र)

नवी मुंबई – नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सीवूड्स पश्चिम येथील न्युरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट हॉस्पिटल सेक्टर ४० येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु, या हॉस्पिटलमध्ये ऑटिझम मुलांसाठी बेकायदेशीरपणे स्टेम सेल थेरपी वापरल्याबद्दल व इतर उपचारांची जाहिरात केल्याबद्दल नवी मुंबई महापालिकेने कारवाई करत या हॉस्पिटलचा परवाना रद्द केला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला दिली.

आयसीएमआरनुसार, स्टेम सेल थेरपीला ऑटिझम रुग्णासाठी मान्यता नाही. अद्याप या उपचारपद्धतीबद्दल कोणतेही ठोस संशोधन प्राप्त झाले नसतानाही विविध ७५ देशांतील १२५०० पेक्षा अधिक रुग्णांवर या रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. संबंधित उपचारासाठी पाच ते दहा लाख रुपये आकारण्यात येत होते. त्यामुळे चुकीच्या व मान्यता नसलेल्या पद्धतीने हॉस्पिटलमध्ये उपचार करत असल्याने या हॉस्पिटलवर नवी मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने २६ डिसेंबर ते २२ फेब्रुवारीदरम्यान या हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यानंतर या ठिकाणी सुरू असलेल्या हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णालय लवकरच सील केले जाणार असून, पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई महानगरपालिका केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू; आज संध्याकाळी अंतिम लढत

न्युरोजन हॉस्पिटलचे मालक डॉक्टर आलोक शर्मा, तसेच या रुग्णालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. पालिकेच्या कारवाईनंतर या रुग्णालयातर्फे अधिक सुरक्षा ठेवण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच रुग्णालयाची सानपाडा येथे आणखी एक शाखा असल्याने त्यावरही सोमवारी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला दिली आहे. सीवूडस येथील या रुग्णालयात विविध ७५ देशांतील ऑटिझमग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. स्वीडन, कॅनडा, केनिया, बांगलादेश यासह विविध अनेक देशांतील रुग्णांवर लाखो रुपये आकारणी करून उपचार करण्यात आले आहेत .परंतु, ज्या थेरपीला आयसीएमआरकडून कोणतीही परवानगी नाही त्या थेरपीद्वारे उपचार केल्यामुळे या रुग्णालयावर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा – उरणच्या पाणथळीवर भराव; पर्यावरणवाद्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

सीवूड्स येथे सुरू असलेल्या न्युरोजन रुग्णालयावर महापालिकेने कारवाई केली असून, स्टेम सेल थेरपीला कोणतीही अनुमती देण्यात आलेली नाही. त्या पद्धतीने उपचार केल्यामुळे संबंधित सीवूड्स येथील रुग्णालयावर कारवाई करत त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. याच रुग्णालयाच्या सानपाडा येथील एका शाखेवरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे, असे नवी मुंबई महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पाटील म्हणाले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-02-2023 at 18:18 IST