नवी मुंबई : आपल्या नेत्याला यश मिळो, चांगले आरोग्य लाभो म्हणून पदयात्रा अनेक कट्टर कार्यकर्ते काढतात तसाच सागर पवार नावाचा एक कार्यकर्ता नेरुळ ते तुळजापूर अशी पदयात्रा काढत असून आजच तुळजापूर येथे निघाले आहेत. विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून हा कार्यकर्ता थेट तुळजाभवानीला साकडं घालणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो म्हणून १० पेक्षा अधिक वर्ष तत्कालीन आमदार सुनील धांडे बीड ते तुळजापूर पदयात्रा करत होते. आता नेरुळ ते तुळजापूर अशी पदयात्रा राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांच्यासाठी काढली आहे.
आणखी वाचा-उरणमध्ये दीपावली निमित्ताने रांगोळी प्रदर्शनातून कलेचे दर्शन… १२ ते १९ नोव्हेंबर दरम्यान पर्वणी
सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता राज्याच्या मुख्य पदावर बसावा असे नेहमीच वाटत असते. त्यासाठी कार्यकर्ते देवाला नवस बोलतात, कुणी शपथ खातो अनेकजण वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. नेरूळ मधील सागर पवार यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून नेरूळ ते तुळजापूर पदयात्रा काढली आहे. आजपासून ही यात्रा नेरूळ मधून सुरू होऊन ती १२ दिवस चालणार असून १२ दिवसांनी तुळजापूर या ठिकाणी पोहचणार आहे. सदर पदयात्रेत १२ ते १५ जण सामील असणार आहेत. यावेळी तुळजा भवानीला अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडे घालणार आहेत. याबाबत अधिक माहिती देताना अजित पवार कसे मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार आहेत हे सांगितले तसेच गावोगावी या पदयात्रे चे स्वागत होईल अशी त्यांनी आशा व्यक्त केली. या अनोख्या पदयात्रेची चर्चा सर्वत्र होत आहे.