नवी मुंबई पालिका शाळांतील शिक्षकांवर अतिरिक्त भार

नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या ९००ने वाढल्याचा दावा शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी केला आहे. विद्यार्थीसंख्या वर्षांगणिक वाढत असताना शिक्षक मात्र अपुरेच आहेत. त्यातच शिक्षकांवर अध्यापनेतर कामांचाही भार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शाळांमध्ये सुमारे ६० शिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या प्राथमिक विभागात मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या ५३ शाळा आहेत. गतवर्षी प्राथमिक विभागासाठी ७४ शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया करण्यात आली, मात्र केवळ ४८ शिक्षकांचीच भरती करण्यात आली. त्यातच यंदा पटसंख्याही वाढली. त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही विभागांत शिक्षकांची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे.

पालिका शिक्षण विभागाअंतर्गत ११६ बालवाडी वर्ग, ५३ प्राथमिक शाळा आणि १८ माध्यमिक शाळा आहेत. कोपरखैरणे व सीवूड्स येथे सीबीएसई शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. प्राथमिक व माध्यमिक विभागांत विद्यर्थीसंख्या वाढली आहे. महापालिका स्थायी समिती सभेत व महासभेत शाळांमधील अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची टीका करण्यात आली होती. त्यानंतर ४८ शिक्षकांची भरती करण्यात आली, मात्र तरीही विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत शिक्षक अपुरेच आहेत.

पटसंख्येनुसार ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नियुक्त करणे आवश्यक आहे. माध्यमिक विभागात १८ पैकी १५ शिक्षकांना काम मुख्याध्यापकाचे करावे लागत असले, तरी त्यांना पद आणि वेतन शिक्षकांचे दिले जात आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या प्राथमिक विभागात मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या ५३ शाळा आहेत. या शाळांत ५३३ कायम शिक्षक आहेत. ११६ ठोक मानधनावरील शिक्षक आहेत. माध्यमिक विभागाच्या एकूण १८ शाळा असून त्यामध्ये १७ मुख्याध्यापक, ३५ कायम शिक्षक, ३१ शिक्षणसेवक आणि ३२ ठोक मानधनावरील शिक्षक कार्यरत आहेत. पटसंख्येच्या तुलनेत या विभागातही शिक्षकांची कमतरता आहे. महापालिकेच्या पूर्वप्राथमिक , प्राथमिक व माध्यमिक शाळांची एकूण पटसंख्या ४१ हजार ७५९ असून संचमान्यतेनुसार आवश्यक तेवढे शिक्षक नेमण्यात येतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

नवी मुंबई महापालिकेतील प्राथमिक व माध्यमिक विभागांत कायम व ठोक मानधनावर सध्या अनेक शिक्षक कार्यरत आहेत. नव्याने भरतीप्रकिया राबवली असून काही शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येत आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे अर्ज मागवून ठेवण्यात आले आहेत. आवश्यकतेप्रमाणे शिक्षक नेमणुका करण्यात येतील.

– डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका

विभागवार विद्यार्थी

पूर्वप्राथमिक     ६११२

प्राथमिक       ३०३८९

माध्यमिक      ४१७५९