आठवडाभरात शंभर टक्के लसमात्रा देण्याचे नियोजन नवी मुंबई : करोना रुग्णवाढ सुरू झाल्यानंतर शहरातील लसीकरणालाही वेग आला आहे. त्यात पालिका प्रशासनाने किशोरवयीन मुलांच्या लसीकरणावर भर दिला असून दररोज आठ ते नऊ हजार जणांचे लसीकरण करण्यात येत असून पात्र लाभार्थीपैकी ६० टक्के मुलांना पहिली लसमात्रा देण्यात आली आहे. तर शहरात दोन्ही लसमात्रा घेतलेल्यांची संख्याही ९० टक्केपर्यंत गेली आहे. ३ जानेवारीपासून शहरात १५ ते १८ या किशोरवयीन गटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले. यासाठी शहरातील ७३,३७३ विद्यार्थी पात्र आहेत. पालिका प्रशासनाने २०६ शाळांमध्ये लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे. त्यात पहिल्या पाच दिवसांतच पालिकेने ५९.८८ टक्के लसीकरण पूर्ण केले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. तर पुढील आठवडाभरात या गटातील १०० टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य आहे. महानगरपालिकेच्या २३ नागरी आरोग्य केंद्रांमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये ३ ते १० जानेवारी या कालावधीत लसीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये महानगरपालिका व खासगी अशा एकूण २०६ शाळांमधील २००७ किंवा त्यापूर्वी जन्म झालेल्या ७३ हजार ३७३ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी साधारणत: २५ हून अधिक शाळांमध्ये दररोज ८ ते १० हजार विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. ’ पात्र विद्यार्थी - ७३३७३ ’ पहिली मात्रा ४३९३८ पाच दिवसांतील लसीकरण ३ जानेवारी - ९०७० ’ ४ जानेवारी - १०,००५ ’ ५ जानेवारी- ८८४६ ’ ६ जानेवारी- ८४३५ ’ ७ जानेवारी- ७५८२ ’ एकूण- ४३९३८ विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसमात्रा दिली जात आहे. पाच दिवसांत ४३,९३८ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तरी उर्वरित सर्व पालकांनी आपल्या पाल्यांचे लसीकरण करून घ्यावे. - डॉ. रत्नप्रभा चव्हाण, लसीकरणप्रमुख