बेलापूर ते आयकर कॉलनी नागरिकांचा प्रवास निर्धोक होणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेलापूर गाव आणि आयकर कॉलनीला जोडणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाच्या कामास अखेर सुरुवात झाली आहे. भूमिपूजन होऊनही बरेच महिने या पुलाचे काम सुरू झाले नव्हते. भूमिपूजन समारंभात एप्रिल-२०१८ पर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन खासदार राजन विचारे यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत कामास सुरुवातही झालेली नव्हती. ‘लोकसत्ता’ने याप्रकरणी वृत्त देऊन लक्ष वेधले होते. अखेर उशिराने का होईना आता पुलाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे काही महिन्यांतच हा पूल वाहतुकीसाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक बाळगून आहेत.

बेलापूर गाव आणि आयकर कॉलनी यांच्यामधून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर रूळ ओलांडताना आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील पादचारी पुलाची नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. पनवेल-सीएसएमटी मार्गावर वेगाने काम सुरू आहे.  बेलापूर खारकोपर मार्गावरील पुलाचे काम अद्याप होणे बाकी आहे. त्यासाठी रेल्वेला मेगाब्लॉक घ्यावा लागणार आहे.

बेलापूर हे नवी मुंबईतील मूळ प्रकल्पग्रस्त गावांमधील एक प्रमुख गाव आहे. पारसिक डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मूळ गावात मुख्य बाजारपेठ होती. त्यामुळे सध्याच्या पालिका क्षेत्रातील नागरिक येथे खरेदीसाठी येत. पुढे शहराची लोकसंख्या वाढत गेली. पासरिक डोंगराच्या पायथ्याशी आयकर वसाहत वसलेली आहे. याच आयकर कॉलनीशेजारी शाळाही आहे. बेलापूर गाव आणि वसाहतीच्या मधून बेलापूर-खारकोपर रेल्वे सुरू झाल्याने आता रेल्वेमार्ग ओलांडताना दुप्पट धोका निर्माण झाला आहे. आयकर वसाहतीत आजही जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी, विद्यार्थ्यांना शाळेसाठी बेलापूर गावात ये-जा करावे लागते. हजारो नागरिक रेल्वेमार्ग ओलांडूनच येतात. त्यामुळे रेल्वे अपघातात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. याठिकाणी पादचारी पूल किंवा भुयारी मार्ग व्हावा यासाठी रेल्वे रोको, रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते. अखेर आता हे काम सुरू झाले आहे.

सुरुवातीला या ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सर्वेक्षणानंतर या ठिकाणी भुयारी मार्ग करता येणार नसल्याचा अहवाल रेल्वेने दिला. त्यानंतर इथे पादचारी पुलाचा प्रस्ताव मांडण्यात आला.

अनेक वर्षांपासून आम्हाला रेल्वे मार्ग ओलांडून बेलापूरकडे जावे लागते. शाळेतील विद्यार्थीही रेल्वे रूळ ओलांडून जात आहेत. पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास फायदा होणार आहे.

– अलोक गाला, रहिवासी आयकर कॉलनी.

पुलाचे अर्धे काम पूर्ण झाले आहे. अलीकडेच सुरू झालेल्या बेलापूर खारकोपर या मार्गावर मेगाब्लॉक घेऊन काम करावे लागणार आहे. त्यासाठी रेल्वेकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे मेगाब्लॉकघेऊन उर्वरित पादचारी पुलाचे काम करण्यात येणार आहे. महिन्याभरात रेल्वे मार्गावरील पादचारी पुलाचे कामाचे पूर्ण करण्यात येईल.

–  राजन विचारे, खासदार

पादचारी पुलाचे काम सुरू झाले आहे. सुरुवातीला फक्त पनवेल आणि सीएसटीकडे जाणाऱ्या गाडय़ा येथून जात होत्या. आता बेलापूर खारकोपर मार्ग सुरू झाल्याने चार रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते. त्यामुळे धोका अधिक वाढला आहे.

– विजय गरुड, ज्येष्ठ नागरिक, आयकर कॉलनी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After all the pedestrian pool route start
First published on: 16-11-2018 at 02:56 IST