नवी मुंबई : नवी मुंबईतील मतदार नोंदणीतील घोळ थांबण्याचे नावच घेत नाहीए. बेलापूर विधानसभा क्षेत्रातील मतदार याद्यांमध्ये सुलभ शौचालय, पामबीच रोड आणि महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानावर मतदारांच्या नोंदी सापडल्यानंतर आता आणखी एक भयंकर घोळ ऐरोली मतदार संघातून उघड झाला आहे. यात एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या नावावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर तब्बल २८८ मतदारांची नोंद झाली असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे सदर अधिकारी हे २०१४ पूर्वी याच मतदारसंघात ‘निवडणूक निर्णय अधिकारी’ म्हणून कार्यरत होते. त्यामुळे या नोंदींचा काळ आणि त्यामागील हेतू यावर गंभीर शंका निर्माण झाली आहे.
मनसेने मतदार यांद्यांमधील हा घोळ बाहेर काढल्याने निवडणूक आयोग आणि एकंदरीत निवडणूक प्रक्रिया यावर मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. याआधीही मनसेकडून बेलापूर मतदार संघातील मतदार याद्यांमधील घोळ उघड करण्यात आले आहेत. यात जुईनगरमधील एका सार्वजनिक शौचालयावर मतदारची नोंद सापडली आहे. तर पामबीच रोडवर परिसरात तब्बल २५० मतदारांची नोंदणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर चक्क महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी १५० हुन अधिक मतदारांची नोंद सापडल्याने या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यात आता ऐरोली मतदार संघातील एकाच मोबाईल क्रमांकावर २८८ मतदारांची नोंद सापडल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ऐरोली विधान सभा क्षेत्रातील कोपरखैरणे सेक्टर-२ मध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष चंद्रकांत डांगे यांनी हा प्रकार उघड केला आहे. या सर्व प्रकारात संबंधित अधिकाऱ्यांना काही आर्थिक लाभ पोहोचवण्यात आला आहे का? किंवा माजी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांचा काही आर्थिक फायदा करून दिला आहे का? हे तपासलं जाणं गरजेचं असल्याचे मत डांगे यांनी व्यक्त केले आहे. त्यासोबतच आर्थिक लाभाच्या बदल्यातच या २८८ मतदारांची नोंदणी एकाच क्रमांकावर आणि एकाच यादीत करण्यात आली असल्याचा संशयही डांगे यांनी व्यक्त केला आहे. ही फक्त प्राथमिक तपासात आढळलेली नावे असून, याचा अधिक तपास सुरू असल्याचे डांगे यांनी सांगितले आहे.
निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
एकाच मोबाईल क्रमांकावर शेकडो मतदारांची नोंद होणे म्हणजे निवडणूक आयोगाची पडताळणी यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय असल्याचं स्पष्ट झालं आहे. आधार क्रमांक, मोबाईल ओटीपी आणि स्थानिक पातळीवरील तपासणी या सर्व प्रक्रिया केवळ कागदोपत्री पार पडल्या असाव्यात, असा संशय व्यक्त केला जात आहे. मनसेने या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि राजकीय हस्तकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा फक्त तांत्रिक घोळ नाही, तर योजनाबद्ध गैरप्रकार असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
या घटनेनंतर मतदार नोंदणी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. निवडणुका जवळ आल्या असताना अशा घोळांनी लोकशाही प्रक्रियेवरील सर्वसामान्य नागरिकांचा विश्वासच डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
